
मालाड येथील एका हॉटेलमध्ये व्यावसायिकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीनिवास पार्थसारथी असे त्याचे नाव आहे. घडल्या प्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
श्रीनिवास हे व्यावसायिक असून ते मालाडमध्ये राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कौटुंबिक वाद सुरू होता. श्रीनिवासची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर तो मालाड येथील हॉटेलमध्ये राहत होता. सोमवारी सकाळी आठ वाजता श्रीनिवासचा सहकारी कामावर गेला. त्यानंतर अकराच्या सुमारास श्रीनिवासने त्याच्या सहकाऱ्याला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा सहकारी हॉटेलमध्ये आला तेव्हा श्रीनिवास हा फक्त हात पाय हलवत होता. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.




























































