गुगलवर ‘कोरोना’ नव्हे; ‘आयपीएल’ सर्वाधिक सर्च!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. यानिमित्ताने प्रत्येक जण वर्षभरातील आठवणींना उजाळा देत आहेत. गुगलनेदेखील नुकतीच ‘इयर इन सर्च 2021’ ही यादी प्रसिद्ध करत गेल्या वर्षभरात हिंदुस्थानींनी गुगलवर सर्वाधिक कोणत्या गोष्टी सर्च केल्या याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या संकटातही हिंदुस्थानींचे क्रिकेटप्रेम पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षभरात हिंदुस्थानींनी ‘कोरोना’ नव्हे तर ‘आयपीएल’ सर्वाधिक सर्च केल्याचे पाहायला मिळाले. त्यापाठोपाठ ‘कोविन’ आणि ‘आयसीसी टी-20’ विश्वचषक सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.

प्रत्येक वर्षाच्या शेवटी गुगलकडून विविध कॅटेगरीतील ‘इयर इन सर्च’ ही यादी प्रसिद्ध केली जाते. टॉप 10 सर्च रिझल्टमध्ये ‘युरो कप’ चौथ्या तर ‘टोकियो ऑलिम्पिक’ पाचव्या स्थानावर आहे. ‘कोविड लस’ हा देशातील सहाव्या क्रमांकाचा ट्रेंडिंग विषय होता, त्यानंतर ‘फ्री फायर रिडीम कोड’ आणि ‘कोपा अमेरिका’ यांचा नंबर लागतो. ट्रेंडिंग सर्च यादीत गोल्डन बॉय नीरज चोप्रा नवव्या तर आर्यन खान दहाव्या क्रमांकावर आहे.

‘जयभीम’, ‘शेरशहा’ ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये

देशभरात सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांमध्ये अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा तमीळ चित्रपट अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘शेरशहा’ आणि सलमान खानचा ‘राधे’ या चित्रपटांबद्दल सर्वाधिक सर्च केले गेले. टॉप 10 सेलिब्रेटी सर्चमध्ये हिंदुस्थानला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा अव्वल स्थानी असून त्यापाठोपाठ आर्यन खान आणि शहनाज गिल यांचा समावेश आहे. टेस्ला कार कंपनीचे मालक एलोन मस्क गुगलवरील सर्वात ट्रेंडिंग व्यक्तिमत्त्वामध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.

टोकियो ऑलिम्पिक हा वर्षातील सर्वात ट्रेंडिंग बातम्यांमधील विषय होता. त्यापाठोपाठ ब्लॅग फंगस, अफगाणिस्तानातील बातम्या सर्च केल्या गेल्या. सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या पाककृतींमध्ये एनोकी मशरूम, मोदक, मेथी मटर मलाई यांचा समावेश आहे. कोविड लसीसाठी नोंदणी कशी करावी, लसीचे प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे या गोष्टीदेखील गुगलवर सर्च करण्यात आल्या. ब्लॅक फंगस म्हणजे काय, हा गुगलला सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न ठरला आहे.