
इंग्लंडला पहिल्या दिवशी 147 धावांत गुंडाळणाऱया यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱया दिवशीही आपले वर्चस्व कायम राखले. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 84 षटकांत 7 बाद 343 धावा केल्या होत्या. मार्क्स हॅरिसच्या विकेटनंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी जोरदार खेळ करीत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. यादरम्यान वॉर्नर नशीबवान ठरला. बेन स्टोक्सने बोल्ड केले, पण नो बॉलमुळे तो क्रीझवरच राहिला. वॉर्नरला इंग्लंडकडून एकूण 5 जीवदानं मिळाली तरीही तो या लढतीत आपले कसोटी शतक पूर्ण करू शकला नाही. त्याला 94 धावांवर रॉबिन्सनने स्टोक्सद्वारे झेलबाद केले. 6 धावांनी हुकलेले वॉर्नरचे शतक मनाला चटका लावून गेले. त्यानंतर ट्रेव्हिस हेडने नाबाद 112 धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवून दिली. इंग्लंडच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका त्यांना बसला.
पंचाच्या दुर्लक्षावर संताप
स्टोक्सच्या पहिल्याच षटकावरून वाद सुरू झाला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 13 व्या षटकात कर्णधार जो रूटने बेन स्टोक्सकडे चेंडू सोपवला. पहिल्या तीन चेंडूंवर चार धावा आल्या चौथ्या चेंडूवर वॉर्नर क्लीन बोल्ड झाला. टीव्ही अंपायरने तपासले असता तो नो बॉल असल्याचे आढळून आले. त्यावेळी वॉर्नर 17 धावा करून खेळत होता. नंतरच्या रिप्लेवरून असे दिसून आले की, स्टोक्सचे पहिले तीन चेंडूही नो बॉल होते ज्याकडे टीव्ही अंपायरने दुर्लक्ष केले. पंचांच्या या कृतीवर ऑस्ट्रेलियात संताप व्यक्त केला जात आहे.




























































