
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांना झापलं आहे. गुरुवारी झालेल्या एका जाहीर सभेत ममता यांनी महुआ यांना ताकीद दिली आहे.
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्याच्या प्रमुख पदावरून महुआ यांना काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर तिथे जयंत शहा यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गेल्या महिन्यात महुआ यांच्या समर्थकांनी शहा यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते.
त्याच प्रसंगावरून ममता यांनी महुआ मोईत्रा यांना ताकीद दिली आहे. ममता यावेळी म्हणाल्या की, महुआ, मी इथे एक स्पष्टपणे सांगू इच्छिते. मला इथे कोणाविरुद्ध कोण आहे, यात अजिबात स्वारस्य नाही. पण, जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा फक्त आणि फक्त पक्षच ठरवेल की उमेदवारी कुणाला द्यायची अथवा कुणाला नाही. तेव्हा याबाबत आणखी मतभेद नकोत, असं ममता यावेळी म्हणाल्या आहेत.
एकच माणूस एकाच जागी कायम राहावा, असं वाटण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ममतांच्या या विधानांवेळी मोईत्रा या देखील उपस्थित होत्या. एका जाहीर सभेत आपल्याच पक्षाच्या खासदाराला ममतांनी अशी ताकीद दिली आहे.




























































