
पृथ्वीजवळून हिरव्या शेपटीचा धुमकेतू जाणार आहे. लियोनार्ड असे या धुमकेतूचे नाव असून 12 डिसेंबर रोजी ही दुर्मीळ घटना घडणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 70 हजार वर्षांनी हा धुमकेतू पृथ्वीजवळून जाणार असून जानेवारी 2021 मध्ये याबाबत माहिती मिळाली होती. या धुमकेतूला C/2021 A1 या नावानेही ओळखले जाते.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरव्या शेपटीचा लियोनार्ड धुमकेतू 12 डिसेंबर रोजी पृथ्वीजवळून जाईल. हा धुमकेतू पृथ्वीपासून तब्बल 21 मिलियन मैल (32 मिलियन किलोमीटर) अंतरावरून जाणार आहे. रात्रीच्या वेळी हा धुमकेतू दिसणार असून जसा पृथ्वीच्या जवळ येईल तशी त्याची चमक वाढत जाईल. टेलिस्कोप किंवा दुर्बिणीच्या सहाय्यानेही हा धुमकेतू पाहता येईल.
या धुमकेतूचा शोध खगोलतज्ज्ञ ग्रेगरी जे लियोनार्ड यांनी केली. यामुळे या धुमकेतूला त्यांचे नाव देण्यात आले. हा धुमकेतू 35 हजार वर्ष पृथ्वीबाहेरील अंतरिक्षामध्ये राहिला होता आणि आता पुन्हा एकदा पृथ्वीजवळून जाणार आहे.
कधी पाहता येईल?
हा धुमकेतू पाहण्याची सर्वात चांगली संधी 12 डिसेंबरला सूर्योदयापूर्वी मिळणार आहे. तसेच 14 डिसेंबरनंतर सूर्यास्तानंतर हा धुमकेतू पाहू शकता. हा धुमकेतू 12 डिसेंबरला पृथ्वीजवळून जाणार असला तरी 17 डिसेंबर रोजी हा धुमकेतू अधिक स्पष्ट पाहता येईल. यावेळी हा धुमकेतू अधिक चमकदार होईल. या दरम्यान धुमकेतूची हिरवी शेपटीही स्पष्ट दिसणार आहे.
पृथ्वीसाठी धोकादायक आहे का?
हिरव्या रंगाची शेपटी म्हणजे धुमकेतूचे तापमान अधिक. त्यामुळे हा धुमकेतू फुटण्याचीही शक्यता असल्याचे खगोलतज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र याचा पृथ्वीला कोणताही धोका असणार नाही, असेही खगोलतज्ज्ञांनी म्हटले.



























































