
कश्मीर खोऱयात दहशतवादी पुन्हा सक्रीय झाले आहेत. जम्मू-कश्मीरच्या बांदिपोरा जिह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले असून सुरक्षा दलांनी त्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करून ‘सर्च ऑपरेशन’ सुरू ठेवले आहे. तसेच ठिकठिकाणी सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे.
मोहम्मद सुल्तान आणि फयाज अहमद अशी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱयांची नावे आहेत. बांदिपोरा जिह्यातील गुलशन चौक परिसरात पोलीस पथक तैनात होते. या पथकावर शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी अचानक बेछूट गोळीबार सुरू केला. यात सुल्तान आणि अहमद यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथील उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. दहशतवादी अज्ञात वाहनातून गुलशन चौक परिसरात आले होते. हल्ला केल्यानंतर लगेच त्यांनी तेथून पळ काढला. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे ‘सर्च ऑपरेशन’ सुरू ठेवले आहे. दरम्यान, हा हल्ला कुठल्या दहशतवादी संघटनेने घडवून आणला, ते अजून स्पष्ट झालेले नाही.
चार महिन्यांत पोलिसांवर हल्ल्याची तिसरी घटना
- मागील चार महिन्यांपासून कश्मीरात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.
12 सप्टेंबर रोजी श्रीनगरच्या खानयार परिसरात दहशतवाद्यांनी प्रोबेशनरी उपनिरीक्षक अर्शद अहमद मीर यांच्यावर गोळी झाडली होती. - त्यानंतर 7 नोव्हेंबरला श्रीनगरच्या बटमालू परिसरात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्या वेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात 29 वर्षांचा पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. तौसीफ अहमद असे त्या शहीद काॅन्स्टेबलचे नाव आहे.























































