तीन वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल दरोडेखोराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील सराफी दुकानावरील दरोडय़ावेळी पोलीस पथकावर गोळीबार करून जखमी अवस्थेत फरार असणाऱया सराईताला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. नगर जिह्यातील तीन गंभीर गुह्यांतही तो फरार होता. सुनीलसिंग जितसिंग जुनी (रा. काटवण खंडोबा, नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

12 सप्टेंबर 2018 रोजी रात्री एका पांढऱया रंगाच्या तवेरा कारमधून आठ ते नऊजण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने नगर शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नगर-मनमाड महामार्गावरील निंबळक बायपास चौकात नाकाबंदी केली होती. मिळालेल्या माहितीच्या वर्णनाची तवेरा कार येत असल्याचे पाहून पोलिसांनी कारचालकाला कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, गतिरोधकाजवळ चालकाने कारचा वेग कमी केला. त्याच वेळी गाडीत बसलेले 3 ते 4 जण उतरून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यात जुनी याचा समावेश होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर सुनीलसिंग जुनी हा 2019 साली नाशिकमधील आडगाव येथील आर. के. ज्वेलर्स या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दरोडा टाकून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांच्या वाहनाचा व सायरनचा आवाज ऐकून पळून जात होता. त्याचा पाठलाग करणाऱया पोलीस पथकावर त्याने गावठी कट्टय़ातून गोळीबार केला होता. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात पायाला गोळी लागून तो जखमी झाला होता. तेव्हापासून तो फरार होता.

दरम्यान, जुनी हा काटवण खंडोबा येथे स्वतःचे नाव बदलून व वेषांतर करून राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह तेथे छापा मारून जुनी याला अटक केली. आरोपी सुनीलसिंग जितसिंग जुनी याच्यावर यापूर्वी दरोडा, दरोडय़ाची तयारी, घरफोडी, चोरी व विनयभंग असे एकूण 5 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, आडगाव (जि. नाशिक), कोतवाली व एमआयडीसी अशा एकूण 4 गुह्यांत तो फरार होता.