
गोवा विधानसभेची निवडणूक नव्या वर्षात होत आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) एकला चलोची भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘आप’ आणि तृणमूल काँग्रेस एकत्रित गोवा विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. त्याबाबत ‘आप’चे गोवा राज्याचे प्रमुख आतिशी यांनी साफ नकार दिला असून आम्ही सर्व जागा स्वतःच्या ताकदीवर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गोव्यामध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्र पर्याय म्हणून जनतेसमोर जाणार आहे. या निवडणुकीत आम्ही चांगले उमेदवार देणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार मिळू शकेल असा विश्वास आतिशी यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालस्थित एका लेखकाने एका वृत्ताचा हवाला देत आप तृणमूल काँग्रेससोबत गोव्यात आघाडी करणार असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर बोलताना आतिशी यांनी ‘आप’ गोव्यात कोणासोबतही जाणार नाही. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आपणे सर्व जागा लढवल्या होत्या, मात्र त्यामध्ये त्यांना एकही जागा मिळाली नव्हती.
गोव्याला आता देवानेच वाचवावे
आपण गोव्यात सत्तेत आल्यानंतर येथील साडेतीन लाख महिलांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये देऊ अशी घोषणा केली आहे. त्यावर बोलताना काँग्रेसचे गोवा प्रभारी पी. चिदंबरम यांनी ट्विट करत ‘गॉड ब्लेस गोवा, गोव्याला आता देवानेच वाचवावे’ असे म्हटले आहे. तसेच साडेतीन लाख महिलांना प्रत्येक महिन्याला पाच हजार म्हणजे महिन्याला सरकारवर 175 कोटी रुपयांचा तर वर्षाला 2100 कोटी रुपयांचा भार येणार आहे. त्यामुळे 23 हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गोव्याला हे सहजशक्य आहे, असा उपरोधिक टोलाही चिदंबरम यांनी लगावला आहे.





























































