
कानडी सरकारच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात कन्नड वेदिकेच्या गुंडांनी धुडगूस घातला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करीत काळी शाई फेकण्यात आली. कन्नडिगांच्या या भ्याड कृत्याचा एकीकरण समितीने तीव्र निषेध नोंदवला असून उद्या बेळगाव बंदची हाक दिली आहे.
सीमालढय़ाचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात हिवाळी अधिवेशन आयोजित करून कर्नाटक सरकारने मराठी भाषकांना दडपण्याचे कारस्थान केले. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी व्हॅक्सिन डेपो येथे जय्यत तयारीही सुरू केली होती. या ठिकाणी करवे येथील कन्नड वेदिके रक्षण समितीचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी चर्चा करायचे असल्याचे सांगून दीपक दळवी यांना बाजूला नेले. त्यांच्यावर शाई फेकून तेथून पळ काढला. या भ्याड कृत्याबाबत मराठी भाषकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कन्नड गुंडांवर कारवाई करा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या हल्ल्याबाबत टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या मंगळवारी बेळगाव, खानापूर, निपाणी तालुके कडकडीत बंद पाळला जाणार आहे, अशी घोषणा पदाधिकाऱयांनी केली. हल्लेखोरांवर शासनाने कडक कारवाई करावी अन्यथा त्यांना आमच्या ताब्यात द्यावे. त्यांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ, असा इशारा दिला आहे.
पोलीस काय करत होते
पोलिसांच्या समोर दळवी यांच्यावर हल्ला झाला. त्यामुळे हल्ला होत असताना पोलीस काय करत होते, असा सवाल पदाधिकाऱयांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना संसदेत आवाज उठवेल
शिवसेना नेहमी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. बेळगाव सीमाप्रश्न जोपर्यंत सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तोपर्यंत बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित घोषित करावा अशी आग्रही मागणी शिवसेना खासदारांकडून संसदेत लावून धरली जाईल, कर्नाटकने कितीही अत्याचार केला, तरी आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आमचा लढा सुरू ठेवू, अशी भूमिका यावेळी शिवसेनेचे बेळगाव सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी मांडली.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, समितीचे प्रकाश मरगळ मनोहर किनेकर, शिवाजी सुंडकर, मालोजी अस्टेकर, दिलीप बैलूरकर, राजू तुडेयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, पावशे अण्णा यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.
चळवळ थांबणार नाहीः अजित पवार
हा मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळ थांबणार नाही. या मराठी सैनिकामागे महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्याड हल्ल्याचा निषेध केला.































































