वृद्ध मातापित्यांना छळणाऱया मुलाला हायकोर्टाचा दणका; दोन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रतिंद्र नाईक

घर बळकावण्यासाठी वृद्ध आई-वडिलांचा छळ करणाऱया मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला. दंडाधिकाऱयांनी आई-वडिलांना देखभाल खर्च व थकबाकी देण्याचे आदेश देऊनही पत्नीच्या आजारपणाची सबब सांगून टाळाटाळ केल्याप्रकरणी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी याचिकाकर्त्या मुलाला झापले. आई वडिलांना देखभाल खर्च म्हणून 5 हजार व भरपाईची थकीत रक्कम 2 लाख 10 हजार रुपये द्यावेत असे आदेश न्यायालयाने त्याला दिले.

लोअर परेलमधील सत्यकी नगर येथे गौमातादेवी यादव (72) या पती राममुरत, मुलगा विनोद कुमार व त्याच्या पत्नी सोबत राहतात. घर नावावर करावे म्हणून मुलगा त्रास देत असल्याने दादर दंडाधिकारी न्यायालयात यादव दांपत्याने याचिका दाखल केली. न्यायदंडाधिकाऱयांनी विनोदकुमारला मातापित्यांच्या देखभालीसाठी महिन्याला देखभाल खर्च 5 हजार रुपये तसेच भरपाईची रक्कम देण्याचे आदेश 8 मार्च 2021 रोजी दिले. तसेच आईवडिलांचे घर महिनाभरात सोडण्यास सांगितले. या आदेशाविरोधात मुलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गौमातादेवी यांच्या वतीने अॅड. अजय जैस्वाल आणि अॅड. विश्वजीत बाबर यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

पत्नीला किडनीचा त्रास, पैसे देऊ शकत नाही

दुसऱया सत्रात झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. आनंद मिश्रा यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आपल्या अशिलाच्या पत्नीला किडनीचा त्रास असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे देखभाल खर्च देणे सद्या परवडणारे नाही. त्यावर न्यायमूर्ती याचिकाकर्त्याला म्हणाले, घरातल्या अडचणी आम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्या आईला सांगा व देखभाल खर्च द्या.