एका डुलकीने थेट पोहोचला दुबईत! विमान कर्मचाऱ्याचा प्रताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोळ्यांवर गाढ झोप आली की, स्थळकाळाचं भान राहत नाही. अनेकांना तर काम करताना झोप येते. मग काय व्हायचा तो घोटाळा होतोच. अशीच परिस्थिती ओढवली एका विमान कर्मचाऱयावर. विमानात प्रवाशांचे सामान चढवताना झोप आल्याने हा कर्मचारी (लोडर) थेट मुंबईहून अबुधाबीला पोचला.

इंडिगो एअरलाइन्समध्ये लोडर म्हणून काम करणाऱया कर्मचाऱयासोबत हा प्रकार नुकताच घडला. 6 ई- 1835 हे विमान मुंबईहून अबुधाबीला उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. प्रवाशांचे लगेज चढवून झाल्यानंतर या कर्मचाऱयाला जास्त काम नव्हते. त्यामुळे तो कार्गो कंपार्टमेंटमध्येच सामानाच्या मागे झोपला. कार्गोचा दरवाजा बंद होता. विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतले. गाढ झोपेत असलेल्या कर्मचाऱयाला याचा काहीच थांगपत्ता नव्हता. अबुधाबीला विमान पोचले. स्थानिक कर्मचाऱयांनी कार्गो कंपार्टमेंटचे दार उघडल्यावर तेही दचकले. त्यांना आतमध्ये लोडर बसलेला दिसला. त्यांनी तत्काळ सुरक्षा यंत्रणांना कळवले. अबुधाबी प्रशासनाने लोडरची वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये लोडरला काहीच दुखापत झाली नसल्याचे आढळून आले. डीजीसीए अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबीच्या अधिकाऱयांच्या मंजुरीनंतर लोडरला त्याच विमानात बसवून परत मुंबईत पाठवण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून कर्मचाऱयाला चौकशी पूर्ण होईपर्यंत कामावरून हटवले आहे.