मुद्दा – ओमायक्रोनचे संकट – गाफील राहू नये !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेश राणे

कोरोनाच्या ‘ओमायक्रोन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराने जगभर धुमाकूळ घालण्यास आरंभ केला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात सतर्कतेचे निर्देश दिले आहेत, तर महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन निर्बंध जारी केले आहेत. सध्या देशभर विवाहाचा सीझन चालू आहे. नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये देशात 25 लाख विवाह होणार आहेत असे वाचनात आले होते. बाजारपेठांत गर्दी कशी ओसंडून वाहत आहे, याची साक्ष बाजारपेठाच देत आहेत. नव्या नियमांचे अवलंबन करताना वरील तीन सूत्रांवर विशेष लक्ष असावे. कित्येक जण बातम्या पाहत नाहीत, वाचत नाहीत. केवळ कोणीतरी सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवतात असे अर्धवटराव बरेच आहेत. असे लोक स्वतःसह इतरांचेही नुकसान करतात.

विवाहांना होणारी गर्दी निर्बंधाची सीमा ओलांडत असेल, तर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. शुभ समारंभ आहे, कारवाई करणे योग्य दिसत नाही असा भावनिक विचार उपयोगाचा नाही. निर्बंधाचे उल्लंघन करणे समजते, मग पालन करण्यात काय अडचण येते? ओमायक्रोनने हिंदुस्थानबाहेर उच्छाद मांडला आहे. त्यामुळे आतापासूनच हिंदुस्थानात त्याच्या नावे का ओरडता ? असा तिरकस विचार करणाऱया अतिशहाण्या लोकांचे पाय जमिनीवर नाहीत. त्यांच्या मते आता कोरोना नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आपण मुक्त संचार करू शकतो या भ्रमात ते आहेत. कारण त्यांना सामाजिक बांधीलकी म्हणजे काय याच्याशी देणेघेणे नाही.

ग्रामीण भागात तर वेगळेच चालू असते. कोरोना गावाकडे नाही, तो तिकडे शहरात आहे. त्यामुळे गावाकडील बहुतांशी लोक मास्कचा उपयोग करत नव्हते. केवळ तालुक्याला जाताना मास्कचा उपयोग नाममात्र होत होता. तेही मास्क हनुवटीवर असे. गावातील टपरीवर अथवा कुठल्यातरी झाडाखाली तासन्तास विनामास्क गप्पांचे फड रंगतात. रिकामटेकडय़ा उठाठेवी करणाऱया या लोकांना चाप लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. बिनकामाचे हे फड गावाचे आरोग्य धोक्यात आणू शकतात. अशा लोकांना विषाणू, त्याची ताकद आदी जाणून घेण्यात रस नसतो. त्यांना केवळ स्वतःचा टाइमपास करायचा असतो. त्यामुळे अशांवर लक्ष ठेवून कारवाई व्हावी.

राजकीय मेळावे न घेता तोच वेळ लोककल्याणासाठी द्यावा. या मेळाव्यांत एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यापलीकडे काही होत नाही. त्यामुळे असे मेळावे नकोच असा जनतेतच सूर आहे. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱयांना आर्थिक दंड आकारण्याची तरतूद असली तरी यासह अन्यही तरतूद असावी. उदा. मास्कचा नीट उपयोग न करणे, दोन डोस घेतले नसतानाही प्रवास करणे यासाठी दंडासह काही दिवस त्यांच्या प्रवासावरच बंदी घालावी. म्हणजे कुठेतरी नियमांचे कठोरपणे पालन होणे चालू होऊन लोकांना थोडी तरी शिस्त लागेल अन्यथा केवळ दंडाचे पैसे देऊन पुढे जाणे होईल आणि पुन्हा केव्हातरी तीच चूक केली जाईल.

ओमायक्रोनशी लढण्यासाठी सर्व प्रौढांचे संपूर्ण लसीकरण, मोठय़ा प्रमाणात एकत्र येणे टाळणे, व्यापक जिनोम सिक्वेन्सिंग, रुग्णांच्या कुठल्याही असामान्य वाढीचे बारकाईने निरीक्षण करणे यामुळे चिंता कमी होऊ शकते. मास्क एक प्रकारची लस आहे. काही दिवसांत या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मिळेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्र्ाज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले आहे. नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी विलंब करू नये तसेच कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आयसीएमआरच्या संसर्गजन्य रोग आणि महामारी विज्ञान विभागाचे प्रमुख समीरन पांडा यांनी म्हटले आहे. यावरून हेच अधोरेखित होते की, मास्कचा उपयोग, लसीकरण आणि नियमांचे पालन अशा ज्या सूत्रांचे पालन करणे शक्य आहे, ते नागरिकांनी केले पाहिजे. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी अनेक जण आळस, चालढकलपणा करत आहेत. ओमायक्रोनच्या निमित्ताने तरी दुसरा डोस घेण्याचे प्रमाण वाढेल आणि हिंदुस्थानात लसीकरणाला लोक लसीचा दुसरा डोस घेऊन वेग आणतील अशी आशा करूया. कोणत्याही नवीन विषाणूवर तत्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी काही कालावधी लागतो. तोपर्यंत वर्तमान उपचारांच्या आधारे पुढे मार्गक्रमण करावे लागते.