
>> प्रा. डॉ. गजानन शेपाळ
ललित कला अकादमी, नवी दिल्ली यांच्यामार्फत सध्या मुंबईत दुसरा ‘आंतरराष्ट्रीय प्रिंट द्विवार्षिक भारत’ या नावाने समारोह अर्थात प्रदर्शन सुरू आहे. ‘प्रिंट मेपिंग’ अर्थात ‘मुद्राचित्रण’ हा कला प्रकार वेगळ्या वैशिष्ट्यांनी कलारसिकमान्य झालेला आहे.
ललित कला अकादमीचे चेअरमन आणि प्रतिथयश शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे यांनी या प्रदर्शनाविषयी माहिती देताना सांगितले की, ‘सदर ‘मुद्राचित्रण’ कला ही साऱया जगभरात, फार प्राचीन काळापासून सुरू असून इतर कला प्रकारांच्या तुलनेने या कला प्रकाराला हवे तेवढे प्रोत्साहन मिळाले नाही. जे प्रोत्साहन ललित कला अकादमीच्या माध्यमातून कलाकारांना देण्यात येत आहे.’ त्याचाच एक भाग म्हणजे सध्या सुरू असलेले दुसरे आंतरराष्ट्रीय मुद्राचित्र कलाकृतींचे प्रदर्शन होय.
‘मुद्राचित्र’ या विषयी सर्वसामान्यांना माहिती मिळावी म्हणून सर जे. जे. स्कूलच्या मुद्राचित्रण विभागाचे प्राध्यापक शशिकांत गोरखे यांनी सविस्तर विश्लेषण केले. फार अद्भुत आणि थक्क करणाऱ्या तांत्रिकतेतून मनोहारी कलाकृती जेव्हा जन्म घेते तेव्हा अक्षरशः कलासक्त मन असलेला रसिक मुग्ध होतो.
तसं पाहिलं तर आपण आपल्या जन्मापासून तर अखेरच्या श्वासापर्यंत ‘मुद्राच’ पाहात असतो. अंगावरील कपड्यांच्या डिझाईन्सपासून तर पुस्तके, छपाई, पैसे-नोटा सारं सारं ‘प्रिंट’च आहेत. ‘मुद्रा’च म्हणतात या साऱ्या दृश्य प्रकारांना. परंतु हे सारे दृश्य मुद्रा प्रकार सार्वजनिक उपयोगाचे असल्यामुळे त्यांची ओळख सर्वसमावेशक ठरली. मात्र ‘आर्टिस्टने केलेले कल्पनायुक्त काम हे त्याची स्वतःची कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्तीचे दृश्यस्वरूप असल्याने, त्यावर त्यांची ओळख स्वाक्षरी आणि इतर आवश्यक तपशील असतो.’ म्हणून निर्माण झालेली कलाकृती ही एकमेव अथवा त्या आर्टिस्टची ओळख दर्शविणारी असल्यामुळे ‘मुद्राचित्रण’ हा कलाप्रकार महत्त्वाचा मानला जातो.
‘आझादीची 75 वर्षे अर्थात आझादी का अमृत महोत्सव’ या शीर्षकाखाली या स्पृहणीय प्रदर्शनाचे आयोजन म्हणजे एक स्तृत्य राष्ट्रीय कार्यक्रमच आहे. 13 राष्ट्रांतील 317 कलाकृती या प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या. अर्जेंटिना, क्रोशिया, फ्रान्स, पोलंड, बांगलादेश, रशिया, मेक्सिको, पेरू, इस्राएल, यु.एस.ए. अशी काही प्रमुख राष्ट्रे भारतीय अमृत महोत्सवी उत्सवात, आपापल्या कलाकारांच्या कलाकृती पाठवून प्रतीकात्मक रूपाने सहभागी झाली आहेत, असेच म्हणावे लागेल. हे सारं श्रेय खरं तर डॉ. उत्तम पाचरणे, चेअरमन ललित अकादमी, नवी दिल्ली यांना आणि त्यांच्या कार्यालयाला द्यायला हवं.
या प्रदर्शनातील कलाकृती या विविध मुद्राचित्रण-निर्मिती प्रक्रियेतून साकारलेल्या पाहायला मिळतात. लिथोग्राफ अर्थात दगडावर काम करून विविध प्रक्रियांनंतर ‘प्रिंट’ मिळविल्या जातात. रबर लिनो, वुड कार्विंग आणि एम.डी.एफ. वुड या माध्यमांद्वारेही प्रक्रियेनंतर थक्क करणाऱया परिणामांसह ‘प्रिंट’ मिळविल्या जातात. तर ‘झिंक प्लेट’चा मुख्य वापर करून लाइन इचिंग, अॅक्वा इचिंग, ‘वेस्कॉसिटी’ (म्हणजे रंगाच्या चिकटपणाचा वापर करून प्रिंट घेणे) आणि ‘मेझॉटिंट’ (यात ‘रॉकर’ नावाचे टूल आहे त्याला पंगव्यासारखे बारीक-बारीक दात असतात. हा ‘रॉकर’ वापरून हवे ते डिझाईन बनवून प्रिंट घेतला जातो.) अशा चार तंत्रांनी ‘मुद्राचित्रण’ कलाकृती बनविली जाते.
अशा विविध आणि वैविध्यपूर्ण तंत्रांनी विकसित झालेल्या ज्ञानाचा आणि कलाकाराच्या कल्पनाशक्तीचा सहयोग या आंतरराष्ट्रीय मुद्राचित्रण कलाकृतींच्या प्रदर्शनात पाहायला मिळतो आहे. ललित कला अकादमी, नवी दिल्ली या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कला विभागाने गेल्या तीन वर्षांपूर्वी म्हणजे, महाराष्ट्रातून ज्यांची निवड हिंदुस्थानचे राष्ट्रपती यांनी ललित कला अकादमीच्या चेअरमनपदी केली. त्या वर्षांपासून 100 हून जास्त कार्यशाळांची आयोजने, शिल्पकार आणि डॉ. उत्तम पाचरणे यांनी त्यांच्या कार्यकालात केली आहेत. जेरुसलेम, अंदमानपासून संपूर्ण हिंदुस्थानात तसेच जगाच्या कलासंपन्न कानाकोपऱयात डॉ. पाचरणे यांनी हिंदुस्थानी संस्कृतीसह जागतिक अस्मितेचा पुरस्कार करून, कलेच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यास पुढाकार घेतला. सध्याचे प्रदर्शन सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे पुढील वर्षारंभापर्यंत म्हणजे 1 जानेवारी 2022 पर्यंत पाहता येईल.
‘मुद्राचित्र’ या विषयी सर्वसामान्यांना माहिती मिळावी म्हणून सर जे. जे. स्कूलच्या मुद्राचित्रण विभागाचे प्राध्यापक शशिकांत गोरखे यांनी सविस्तर विश्लेषण केले. फार अद्भुत आणि थक्क करणाऱ्या तांत्रिकतेतून मनोहारी कलाकृती जेव्हा जन्म घेते तेव्हा अक्षरशः कलासक्त मन असलेला रसिक मुग्ध होतो.
जहांगीर कला दालनातील एक सप्ताहानंतर आता सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या तळमजल्यावरील प्रशस्त कला दालनांमध्ये आपणास जगप्रसिद्ध आणि जगभरातील मुद्राचित्रणकारांच्या कलाकृती प्रदर्शित केलेल्या पाहायला मिळताहेत. सुमारे एक हजारांहून अधिक ‘मुद्रा चित्रकारां’नी ललित कला अकादमीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांच्या कलाकृती पाठविल्या होत्या. तज्ञ परीक्षकांमार्फत 149 निवडक कलाकृती या प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या आहेत. या 149 कलाकृतींमधून रु. दोन लाख याप्रमाणे पाच कलाकृतींना प्रशस्तिपत्रकासह रोख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कलाकृती जगदीश्वरा राव, चंद्रशेखर वसंतराव वाघमारे, दुर्गादास गराई, सुष्मा यादव आणि बांगलादेशी मुद्राचित्रणकार मोहम्मद फक्रुल इस्लाम मझुमदार या पाच मुद्राचित्रणकारांच्या आहेत. यासह आणखी 12 कलाकारांच्या कलाकृतींना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या साऱया कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
(लेखक सर जे. जे. उपयोजित कला महावि.चे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत.)





























































