खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> समीर गायकवाड

ऑनर किलिंगच्या घटना आपल्या देशात मागील दोन दशकांपासून घडताहेत. सुरुवातीला त्याविरोधात देशभरात आक्रोश दिसायचा. आता केवळ हतबलता दिसते आणि धक्का बसलेला जाणवतो. समाज पुन्हा आपल्या दिनचर्येत गढून जातो. मागील दशकांत घडलेल्या बहुतांश घटनांत घरच्या मंडळींचा विरोध पत्करून परधर्मीय वा परजातीय जोडीदाराशी विवाह केलेल्या युगुलासच याला सामोरे जावे लागले होते. मात्र अलीकडील दोन वर्षांत सजातीय विवाह करूनदेखील केवळ आर्थिक विषमतेपायी जीवे मारण्याचा अमानुषपणा दिसून येतोय. समाजात विषमतेचा, जातीयतेचा, अस्मितेचा नि अभिनिवेशाचा अभिमान अहंकार आता किळसवाण्या विखारात बदलत चाललाय ज्यामुळे सामाजिक समतेची मुळे अधिकाधिक कमकुवत होताहेत.

देशात हरयाणा हे राज्य ऑनर किलिंगसाठी सर्वाधिक बदनाम आहे. तिथे कठोर कायदे लागू होऊनही सन्मानाच्या नावाखाली प्रेम आणि सन्मानाच्या शत्रूची हत्या करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. सोनीपतच्या गोहानामध्ये 10 नोव्हेंबर रोजी ऑनर किलिंगची घटना घडली. प्रेम प्रकरणातून तरुणीच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. भावड गावच्या बिजेंद्रला अमानवी मारहाण करताना क्रूरतेची सीमा ओलांडली. जखमी बिजेंद्रचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. बिजेंद्रच्या हत्येनंतर कुटुंबीयांना एवढा धक्का बसला की, त्यांनी पोलिसांत लवकर तक्रारदेखील दिली नव्हती.

महाराष्ट्रातलं हत्याकांड याहून भीषण होतं. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे सख्ख्या लहान भावाने आणि आईने कीर्ती मोटे-थोरे हिचा शिरच्छेद केला; कारण तिने घरच्यांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केला होता. या घटनेनंतर तिचा भाऊ आणि आई वैजापूर पोलीस स्टेशनात स्वतःहून खुनाची कबुली द्यायला हजर झाले. हे हत्याकांड इतके निर्घृण होते की, राज्य हादरले! तरीदेखील लोकांच्या बधिरतेची कमाल म्हणावी असा घटनाक्रम तिथे नंतर घडला, तो म्हणजे खुनी युवकास अल्पवयीन दाखवण्यासाठी सुरू असलेली खटपट ! हे सर्व पाहू जाता माणूस म्हणून किती अधःपतन झालंय हे लक्षात यावे.

खरे तर ऑनर किलिंगच्या बाबतीत न्यायालयीन आदेश स्पष्ट आहेत. ऑनर किलिंगला संघटित गुन्हा ठरवण्याच्या मागणीसाठी ‘शक्ती वाहिनी’ या एनजीओने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय की, जर दोन प्रौढांनी लग्न केले तर तिसरा कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. यासोबतच हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 5 मध्ये एकाच गोत्रात लग्न न करणे योग्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. इथे हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की, ऑनर किलिंगची केवळ 3 टक्के प्रकरणे गोत्राशी संबंधित आहेत, तर 97 टक्के प्रकरणे धर्म आणि इतर कारणांशी संबंधित आहेत. ऑनर किलिंग म्हणजे कुटुंबातील सदस्याची, विशेषतः महिला सदस्याची त्याच्या नातेवाईकांकडून हत्या. कुटुंब आणि समाजाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली या हत्या अनेकदा केल्या जातात.

ऑनर किलिंगचे मूळ कारण ग्रामीण भागापर्यंत औपचारिकरीत्या सरकार पोहोचू न शकणे हे आहे. पंचायत समितीसारख्या औपचारिक संस्थांच्या अनुपस्थितीत ग्रामीण भागात निर्णय घेण्याची शक्ती खाप पंचायतीसारख्या बेकायदेशीर आणि घटनाबाह्य संस्थांकडे जाते तिथे सारेच मूढ होतात. याला खतपाणी घालणारे घटक म्हणजे निरक्षरता आणि नागरी हक्कांविषयीचे अज्ञान होय. शिक्षणाअभावी समाजातील एक मोठा घटक आपल्या घटनात्मक अधिकारांबाबत अनभिज्ञ आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ऑनर किलिंगचा भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 15 (1), 19, 21 आणि 39 (f) वर नकारात्मक परिणाम होतो. यातील कलम 14, 15 (1), 19 आणि 21 मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत, तर कलम 39 राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांशी संबंधित आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे हे संविधानाचा आत्मा आणि तत्त्वज्ञान म्हणून ओळखले जातात. ऑनर किलिंग हे मानवी हक्कांचे तसेच कलम 21 नुसार सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.

कलम 19 आणि 21 ने अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि वैयक्तिक निवडीचे स्वातंत्र्य मजबूत केले आहे. देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे निश्चितच महत्त्वाचे ठरले आहे. यानुसार आपल्या जीवनाचा जोडीदार ठरवण्याचा हक्क हरेक सज्ञान भारतीयास आहे तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे करणे हा दंडनीय अपराध आहे. ऑनर किलिंगबाबत समाज जागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांना अधिक महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, तसेच लोकांना अधिकाधिक साक्षर करण्यावर भर द्यावा लागेल. वास्तवात देशातील ऑनर किलिंगला आळा घालण्यासाठी न्यायालयांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे, जिथे गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेसह बेकायदेशीर घोषित केले गेले आहे. मात्र, असे गुन्हे पूर्णपणे रोखण्यासाठी सर्व देशवासीयांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण सन्मानासाठी कोणाचाही जीव घेण्यात सन्मान नाही. ते पशुतेहून वाईट आहे!

ऑनर किलिंग हा शब्द जेव्हा पहिल्यांदा कानी आला तेव्हा सारेच थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. पाकिस्तानमध्ये खून किंवा फाशीच्या शिक्षेच्या संदर्भात हा शब्द आपल्या माध्यमात प्रथमतः ऐकला गेला. त्या वेळी असे वाटत होते की, कायद्यानुसार खून किंवा खून यांसारखे शब्द नेहमी एखाद्याचा जीव बेकायदेशीरपणे घेण्याकडे सूचित करतात. ऑनर किलिंगच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे, सतत घट्ट होणारी जातव्यवस्था होय. देशात जातीय समज दृढ होत आहेत. ऑनर किलिंगच्या बहुतांश घटना समाज, जात आणि प्रेमसंबंध या बाबतीत घडलेल्या दिसून येतात. आंतरधर्मीय संबंध हेदेखील ऑनर किलिंगचे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर औपचारिक प्रशासनाचा अभाव हेदेखील एक
कारण आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नुकत्याच दिलेल्या निकालात असेही म्हटले की, पालकांनी किंवा खाप पंचायतींनी प्रौढ व्यक्तींकडून लग्नाबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध करणे बेकायदेशीर आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयाने ऑनर किलिंगबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. मात्र त्याविषयीची कायदेशीर जागृती अत्यंत तोकडी आहे. सन्मानाच्या नावावर गुन्हे प्रतिबंधक विधेयक, 2010 (‘ऑनर’ आणि परंपरा विधेयक, 2010 च्या नावावर गुन्हे प्रतिबंधक) पारित झाले. या विधेयकानुसार जोडप्याच्या लग्नाला नकार देण्याच्या उद्देशाने खाप पंचायतसारख्या कोणत्याही समुदायास, संघटनेस, व्यक्तीविशेषास किंवा तदनुषंगिक ग्रामसभा आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यात नवविवाहित जोडप्यांवर बहिष्कार टाकण्यावर आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचादेखील समावेश आहे. स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि निर्दोषत्व सिद्ध करणे ही आरोपीची जबाबदारी असेल अशी तरतूदही त्यात आहे.