प्रासंगिक – शिवत्वाची ज्वलंत ज्योत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. शरयू जाखडी

संत गाडगेबाबांनी दि. 23 फेब्रुवारी 1876 ते 20 डिसेंबर 1952 या कालावधीत शिवत्वाची ज्वलंत ज्योत हाती घेऊन महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ासह कानाकोपऱयांत स्वच्छता आणि् श्रमप्रतिष्ठsचा देदीप्यमान प्रकाश निर्माण केला. ‘फिटे अंधाराचे जाळे। झाले मोकळे आकाश।’ अशा निरामय वातावरणात अंधश्रद्धा, निरक्षरता, व्यसनाधीनता, अस्वच्छता, भेदाभेद, सावकारी पाश, धर्मांधतेतून प्राण्यांची हत्या, कर्मठपणा या अमंगल विचारांच्या सावलीचे निर्मूलन करून कल्याणप्रद मानवी मूल्यांचे बीजारोपण केले. संत गाडगेबाबा म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिह्यातील शेणगाव (अथवा शेंडगाव) या गावी सखुबाईंच्या पोटी, महाशिवरात्रीच्या शुभदिनी झाला. विश्वाला शिवस्पर्श करण्यासाठी जणू या शिवअवताराचा जन्म झाला. डेबूजींच्या रूपाने स्वच्छतेची प्रकाशगंगा महाराष्ट्रात अवतीर्ण झाली होती. त्यांच्या स्वच्छतेच्या द्रष्टेपणाचे महत्त्व आज कोरोनाच्या काळात विशेष जाणवते. घरादाराची, मनाची आणि गावाची अंतर्बाह्य स्वच्छता ही त्यांनी ईश्वराची पूजा मानली.

संत गाडगेबाबांना लहान वयातच भयावह परिस्थितीचा सामना करावा लागला. बालमनाला बसलेल्या ठेचांतून त्यांना शहाणपणाचे वरदान मिळाले. या विषण्ण परिस्थितीच्या शापातून स्वतःला आणि समाजाला मुक्त करण्याच्या निर्धाराने गाडगेबाबांनी कायमचे घर सोडले. विश्वात्मक देवाच्या घराचा आधार घेऊन सामाजिक परिवर्तनाचे कंकण बांधले. स्वच्छता, स्वावलंबन, भूतदया, सहिष्णुता या सामाजिक मूल्यांसह ‘कर्मण्येवाधिकरस्ते मा फलेषु कदाचन।’ या विचारातून श्रमयज्ञ आरंभला. या श्रमयज्ञातून त्यांनी स्वतःच्या बायको व मुलांनाही सोडले नाही. राखेतून फिनिक्स पक्ष्याने जन्म घ्यावा, तशी समाजपरिवर्तनाची झेप गाडगेबाबांनी घेतली. विघातक रूढी, परंपरा, चिवट कर्मठ विचारांच्या शृखंलांवर दृढ निश्चयाने आघात करायला सुरुवात केली. समाजाच्या विद्रूप चेहऱयासमोर आरसा ठेवून शब्दांची शस्त्र्ाs करून कठोर शब्दांत समाजाची कानउघाडणी केली. नाठाळ समाजाच्या माथी काठी मारताना गाडेबाबा जराही कचरले अथवा घाबरले नाहीत. ‘रीण काढून सण करणे’ त्यांनी पूर्णपणे नाकारले. त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या लग्नसमारंभात कोंबडी आणि दारू यांच्या मागणीला त्यांनी ठाम नकार दिला. व्यसनी व्यक्ती घराला व समाजाला मिळालेला भयंकर शाप आहे आणि ही मानवनिर्मित कीड कठोरपणे नष्ट केली पाहिजे, अशी गाडगेबाबांची स्पष्ट भूमिका होती आणि हे सांगताना ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. असुरी संपत्तीचे निर्मूलन करून दैवी संपत्ती वाढवण्याचा बाबांनी जणू विडा उचलला होता. गीता भगवतातील तत्त्वज्ञान, कीर्तन, प्रवचन, भजनातून बाबांच्या मनावर बिंबले होते. या दैवीगुणांच्या सकस शिदोरीवर कर्मयोगाची कठोर आराधना बाबांनी आरंभली. गावात प्रभाती वासुदेवाची स्वारी येते त्याप्रमाणे बाबा सुप्रभाती ‘गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन म्हणत ग्रामस्वच्छतेसाठी हातात खराटा घेऊन गावात प्रवेश करत. बाबांच्या खडय़ा आवाजाने गाव खडबडून जागा होई. साध्या वेशातील ठिगळांचे कपडे घातलेला हा ईश्वराचा देवदूत हातात खराटा आणि गाडगे घेऊन गावात प्रवेश करीत असे. खराटा आणि गाडगे ही त्यांची ओळख होती. माणसातील माणूसपण शोधण्यासाठी अहोरात्र बाबांनी ही आनंदयात्रा मांडली होती. गावात जाताच ते स्वच्छतेचे अभियान सुरू करीत. स्वच्छता, स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, साक्षरता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन या आधुनिक मूल्यांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेऊन अंतर्बाह्य गाव जागा करण्यासाठी बाबा गावोगावी तळागाळातील लोकांपर्यंत जात असत. त्यांच्या मनातील प्रकाशज्योत लोकांच्या मनातील देव जागा करण्यासाठी गावोगावी भ्रमंती करीत असे. ज्ञानदेव, तुकारामांपासून समाजातील अंधश्रद्धेची जळमटे दूर करण्यासाठी संत पुनः पुन्हा जनजागरण मांडतात.

बाबांनी कीर्तनाद्वारे लोकप्रबोधन केले. श्रोत्यांशी प्रश्नोत्तर स्वरूपाचे नाटय़पूर्ण संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्य अभूतपूर्व होते. समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, वाईट चालीरिती या मर्मांवर बोट ठेवताना त्यांच्यातील बहुरूपी कलावंत जागा होत असे. लोकांना हसवत उपरोधिक शैलीतून खरपूस समाचार घेत असत. मृदुत्वाच्या स्नेहपूर्ण वऱहाडी भाषेतून लोकांचे मनपरिवर्तन करीत. 20 डिसेंबर 1956 या दिवशी हा प्रखर कर्मयोगी सूर्य विराम पावला.