शिवाजी पार्क जिमखान्याचे ‘क्रिकेट गुरुकुल’ पुन्हा बहरतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नामवंत क्रिकेटर मिळवून देणाऱया शिवाजी पार्क जिमखान्याच्या (एसपीजी) क्रिकेट गुरुकुल पुन्हा खेळाडूंनी बहरणार आहे. नुकतेच एसपीजी क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षणार्थी निवडण्यासाठी 12, 14, 16 आणि 19 वर्षांखालील युवा क्रिकेटपटूंची निवड चाचणी जिमखान्याच्या मैदानावर मोठय़ा उत्साहात पार पडली. जिमखाना प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत ही चाचणी यशस्वी केली. या चाचणीला मुंबई आणि शेजारच्या जिह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक युवा क्रिकेटपटू उपस्थित होते. या निवड चाचणीचा निकाल 26 डिसेंबरला लागणार असून चार वयोगटाचे एसपीजी अकादमी संघ जाहीर करण्यात येणार आहेत.

शिवाजी पार्क जिमखाना क्रिकेट अकादमी निवड चाचणी शिबिराचे उद्घाटन जिमखान्याचे उपाध्यक्ष समीर पेठे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रिकेट सचिव सुशांत मांजरेकर, सदस्य समीर भोबे उपस्थित होते. निवड चाचणीचे संचालन जिमखान्याचे मुख्य क्रिकेट प्रशिक्षक सुधीर गाडगीळ करणार आहेत. प्रशिक्षक गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आता शिवाजी पार्क जिमखान्याचे क्रिकेट गुरुकुल पुन्हा बहरणार आहे. मुंबई आणि राष्ट्रीय संघाला होतकरू क्रिकेटपटू पुरवण्याची जिमखान्याच्या ख्याती जपण्यासाठी एसपीजी क्रिकेट अकादमी आता अधिक कार्यशील करण्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे आणि जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर यांचे ध्येय या निवड चाचणी आणि अकादमी संचालनाने पूर्णत्वाला नेण्यात येणार आहे.