
लोकलने प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे स्थानकांत वाय-फाय सेवा पुरविण्यात आल्यानंतर आता लोकलच्या डब्यातही वाय-फाय उपलब्ध करण्यात येणार आहे. ‘कंटेंट ऑन डिमांड’ प्रकारची ही वाय-फाय सेवा असून त्यात डब्यात हॉटस्पॉटद्वारे वायफाय पुरविले जाते. 165 लोकलमधील 3 हजार 465 डब्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. जानेवारी महिन्यात ही वाय-फाय सुविधा उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे.
एसटी महामंडळाने प्रथम ‘कटेंट ऑन डिमांड’ प्रकारची म्हणजे कंपनी पुरवेल तो व्हिडीओ किंवा सीरियल व गाणी पाहण्याची सोय उपलब्ध केली होती, परंतु तिला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मध्य रेल्वेही खासगी कंपनीला हे कंत्राट देणार असून ही कंपनी जाहिरातीद्वारे स्वतःचे उत्पन्न कमविणार असून उलट रेल्वेलाच पैसे देणार आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्यातली ही योजना आहे. लोकलच्या डब्यात उच्च क्षमतेचा वाय-फाय राऊटर बसविण्यात येणार आहे.



























































