दर्जेदार रस्त्यांसाठी थर्ड पार्टी ऑडिट! निकृष्ट कामझाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना दर्जेदार आणि चकाचक रस्ते मिळावेत यासाठी पालिका आता रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करणार आहे. यामध्ये कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. शिवाय निकृष्ट काम झाल्यास संबंधित प्रभागाच्या रस्ते विभागातील अभियंते-अधिकाऱयांना जबाबदार धरण्यात येणार आहे. दरम्यान, आज स्थायी समितीच्या बैठकीत मुंबईसाठी सुमारे अठराशे कोटींचे प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आले.

मुंबईतील पालिकेचे सुमारे 2 हजार किमी लांबीचे रस्ते आहेत. यात सुमारे पाच हजार रस्ते आहेत. यामध्ये प्रकल्प रस्ते आणि दोषदायित्व कालावधीमधील रस्त्यांचा समावेश आहे. मुंबईकरांना दर्जेदार चकाचक रस्ते देण्यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात पालिकेच्या कामातून दीड वर्षाने मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये सुमारे अठराशे कोटींचे 39 प्रस्ताव पालिकेने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी मांडले. या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. या कामांत काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि मलनिस्सारण वाहिन्या, सुविधा वाहिन्यांची कामे केली जाणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा, आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल, संजय घाडी, ‘सपा’चे रईस शेख, राष्ट्रवादीच्या राखी जाधव आदींनी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठिंबा दिला. या कामांतील बहुतांशी रस्ते हे काँक्रीटचे असल्यामुळे खड्डय़ांचा प्रश्न मिटणार असल्याचे यावेळी विशाखा राऊत यांनी सांगितले.

कमी खर्चात दर्जेदार कामे

पालिकेने पहिल्यांदा मागवलेल्या निविदांना कंत्राटदारांनी प्रतिसाद देताना तब्बल 30 ते 35 टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा सादर केल्या होत्या. मात्र इतक्या कमी खर्चात काम केल्यास दर्जा राखला जाणार नसल्याने पालिकेने पुन्हा निविदा मागवल्या होत्या.

यानंतर दुसऱयांदा मागवलेल्या निविदांना कंत्राटदारांनी 18 ते 20 टक्के दराने निविदा सादर केल्या आहेत. त्यामुळे पालिकेला कमी खर्चात रस्त्यांची कामे करून मिळणार आहेत.

शिवाय काम पूर्ण झाले तरी कंत्राटदारांना 20 टक्के रक्कम हमी कालावधी पूर्ण झाल्यानंतरच दिली जाणार आहे. त्यामुळे कंत्राटदारांना रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे बंधनकारक राहणार असल्याने मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळणार आहेत.

मुंबईतील रस्त्यांच्या दर्जेदार कामासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी एजन्सी नेमली जाईल. त्यामुळे रस्त्याच्या कामापासून हमी कालावधीपर्यंत दर्जावर ‘नजर’ राहील, जेणेकरून मुंबईला चांगले रस्ते मिळतील.

संजीवकुमार, अतिरिक्त आयुक्त

राजकारणासाठी ‘भाजप रस्त्यावरून घसरले’!

रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षी आधीच उशीर झाला असल्याने शिवसेनेसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘सपा’ने सर्व प्रस्तावांना जोरदार पाठिंबा दिला. मात्र भाजप नगरसेवकांनी कामांच्या दर्जावर प्रश्न उपस्थितीत प्रस्ताव रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र बहुमताने प्रस्ताव मंजूर होत असल्याचे चित्र स्पष्ट होताच सभागृहातून पळ काढत सभात्याग केला. भाजपची ही स्टंटबाजी केवळ राजकारण असल्याचे सांगत ‘भाजप रस्त्यावरून घसरले’, असा जोरदार टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला. कोविड आणि  निविदा प्रकिया रखडल्याने कामांना आधीच उशीर झाला असताना भाजप मुंबईकरांना नाहक वेठीस धरत असल्याचेही त्यांनी सांगितले.