
‘पॉर्नोग्राफी’प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच उद्योजक राज कुंद्रा याने या प्रकरणावर मौन सोडले आहे. राजने सविस्तर निवेदन जारी केले आहे. ‘प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असून पॉर्नोग्राफीच्या निर्मिती आणि वितरणात मी कधीच सहभागी नव्हतो. हा सगळा प्रकार म्हणजे मला जाणूनबुजून टार्गेट करण्याचा होता’, असे त्याने म्हटले आहे.
अश्लील चित्रपट बनवणे आणि त्याचे वितरण करणे या गुन्ह्याखाली जुलै महिन्यात मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, उद्योजक राज कुंद्रा याला अटक केली होती. सप्टेंबरमध्ये 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणात राजने पहिल्यांदाच सर्व आरोप धुडकावले आहेत. ‘माझ्याबद्दल अनेक दिशाभूल करणारी वक्तव्ये समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. मी शांत आहे याचा अर्थ मी कमजोर आहे असे मुळीच नाही, असे राजने म्हटले आहे.




























































