
दिल्लीत संसदेचे अधिवेशन मोठय़ा काळासाठी सुरू आहे, पण महाराष्ट्रात अधिवेशनाचा कार्यकाल कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिवेशनात चर्चा टाळण्याचा आणि लोकशाही कुलूपबंद करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. या सरकारमध्ये रोकशाही व भोगशाही सुरू असल्याचा आरोप करत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या बुधवारपासून मुंबईत सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका केली.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. या अधिवेशनात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, आरोग्य विभाग व म्हाडातील परीक्षेत झालेली पेपरफुटी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्दय़ांवरून सत्ताधारी पक्षाला काsंडीत पकडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला.
दोन वर्षे इम्पिरिकल डाटा का गोळा केला नाही
ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, इम्पिरिकल डेटा दोन वर्षे झाली तरी सरकारला का गोळा करता आला नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेल्याची टीका त्यांनी केली.
या अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. पण आमच्या 12 आमदारांना निलंबित करून अध्यक्षांची निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने झाली, पण आता नियमबाह्य पद्धतीने ही निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. यावरून या सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पोकळ असल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अॅड. आशीष शेलार, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, अविनाश महातेकर, विनायक मेटे व अन्य नेते उपस्थित होते.
































































