नगरपंचायतींसाठी पश्चिम महाराष्ट्रात शांततेत मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्रातील नगर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिह्यातील मुदत संपलेल्या नगरपंचायतींसाठी आज अत्यंत चुरशीने मात्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. नगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर आणि अकोले, सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, कडेगाव आणि खानापूर, सातारा जिल्ह्यातील लोणंद, दहीवडी, पाटण, कोरेगाव, खंडाळा आणि वडूज, तर सोलापूर जिल्ह्यातील वैराग, मोहोळ, माढा, माळशिरस आणि नातेपुते नगरपंचायतींसाठी आज मतदान झाले. थंडीच्या कडाक्यामुळे सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदानासाठी कमी प्रतिसाद दिला. मात्र, दुपारनंतर मतदानाचा जोर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक आमदार, खासदारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने काही ठिकाणी 18 जानेवारी रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर 19 जानेवारी रोजी सर्व जागांचा निकाल घोषित केला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना निकालासाठी तब्बल एका महिन्याची वाट बघावी लागणार आहे.

साताऱयातील सहा नगरपंचायतींसाठी 75 टक्के मतदान

सातारा जिल्ह्यातील वडूज, दहीवडी, पाटण, कोरेगाव, खंडाळा व लोणंद नगरपंचायतींसाठी आज चुरशीने सरासरी 75 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिह्यातील 78 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 266 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले असून, ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेल्या आणखी 24 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतरच संपूर्ण मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांनाही निकालासाठी जवळपास महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

सातारा जिल्ह्यातील या सर्व नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 जागा असल्या तरी प्रत्येक नगरपंचायतीतील 4 जागांची निवडणूक ओबीसी आरक्षण प्रकरणामुळे लटकली आहे. त्या जागांचे मतदान 18 जानेवारीला होणार असून, 19 जानेवारीला संपूर्ण मतमोजणी होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतींच्या बाबतीत बहुदा प्रथमच निकालासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोरेगाव नगरपंचायतीसाठी 73.33 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 15 हजार 366 मतदारांपैकी 11 हजार 268 मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे. पाटण नगरपंचायत हा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा बालेकिल्ला असून, या बालेकिल्ल्यात शिवसेनेसह काँग्रेसनेही ताकद लावली होती. या ठिकाणी 73.54 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. येथे सर्वाधिक 83 टक्के मतदान प्रभाग क्रमांक 4 मध्ये झाले असून, सर्वात कमी 60.98 टक्के मतदान प्रभाग क्रमांक 9 मध्ये झाले आहे.

वडूज नगरपंचायतीसाठीही अत्यंत चुरशीने 76 टक्के, तर खंडाळा नगरपंचायतीसाठी जिह्यात सर्वाधिक 85.35 मतदान झाले आहे. सहाही नगरपंचायतींसाठी दुपारी साडेतीनपर्यंतच मतदानाचा जवळपास 60 टक्क्यांचा टप्पा ओलांडला गेला होता. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाल्याचे स्पष्ट झाले.

गेले दहा-पंधरा दिवस प्रचाराचा उडालेला कल्लोळ तूर्त शांत झाला असला तरी प्रत्येक ठिकाणी 4 जागांच्या निवडणुका होणे बाकी असल्याने रणधुमाळीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू झालेला पाहायला मिळणार आहे.

कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर नगरपंचायतींसाठी चुरशीने 83 टक्के मतदान

सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकांळ, कडेगाव व खानापूर नगरपंचायतींसाठी 39 जागांसाठी मंगळवारी मोठय़ा चुरशीने मात्र शांततेत मतदान झाले. सरासरी 83 टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक विभागाने वर्तविला आहे.

कडेगाव नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. एकूण 7 हजार 809 मतदारांपैकी 6 हजार 242 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. शांततेत सुमारे 79.93 टक्के मतदान झाले. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम व भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्या गटात जोरदार लढत झाल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड समर्थकांनीदेखील पॅनेल उभे केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या ठिकाणी काँग्रेसला सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे. विश्वजित कदम दिवसभर तळ ठोकून होते.

कवठेमहांकाळ येथील 13 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. या पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांनी केले. त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडी केली गेली होती. भाजपचे खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेच्या संचालिका अनिता सगरे, गजानन कोठावळे यांनी या पॅनेलचे नेतृत्व केले. दिवसभर या ठिकाणी चुरशीने मतदान झाले. तर, खानापूर नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी काँग्रेससह तीन स्थानिक आघाडय़ा झाल्या होत्या. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी जोरदार मुसंडी मारत मतदानाचा टक्का वाढवला. राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांच्यात जोरदार लढत होत आहे.

माळशिरस, वैराग, नातेपुते, श्रीपूर, माढय़ात मतदानाची चुरस

सोलापूर जिल्ह्यात पाच नगरपंचायतींसाठी आज चुरशीने मतदान झाले. सायंकाळी साडेतीनपर्यंत 77.43 टक्के मतदान झाले होते. माढा, माळशिरस, वैराग, नातेपुते व श्रीपूर-म्हाळुंग या पाच नगरपंचायतींसाठी मतदान झाले. वैराग, नातेपुते व श्रीपूर-म्हाळुंग या नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत.

आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पाच नगर पंचायतींसाठी 77.43 टक्के मतदान झाले होते. यात माढा 77.40 टक्के, माळशिरस 82.04 टक्के, म्हाळुंग-श्रीपूर 73.94 टक्के, वैराग 77.04 टक्के, तर नातेपुतेसाठी 76.20 टक्के मतदान झाले होते. सरासरी 75 ते 80 टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. माढय़ात 13 जागांसाठी 37 उमेदवार, वैरागमध्ये 13 जागांसाठी 48 उमेदवार, माळशिरसमध्ये 13 जागांसाठी 45 उमेदवार, नातेपुते येथे 13 जागेसाठी 53 उमेदवार, श्रीपूर-म्हाळुंग येथे 13 जागांसाठी सर्वाधिक 833 उमेदवार रिंगणात आहेत. या पाचही नगरपंचायतींत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. माळशिरसमध्ये मतदानासाठी सर्वाधिक चुरस दिसून आली.

जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींत पोटनिवडणुकांसाठीही मतदान झाले. या निवडणुकीत सायंकाळपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. मतदानाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कर्जत, पारनेर, अकोले नगरपंचायतींसाठी 82.17 टक्के मतदान

नगर जिल्ह्यातील पारनेर, अकोले आणि कर्जत नगरपंचायतींसाठी आज चुरशीने सरासरी 82.17 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. पारनेर नगरपंचायतीत सर्वाधिक 86.09 टक्के मतदान झाले आहे.

पारनेर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत 8 हजार 992पैकी 7 हजार 742 मतदारांनी हक्क बजावला. एकूण 86.09 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक दोन व नऊ या प्रभागांमध्ये दुरंगी, तर इतर 11 प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व शहर विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. शहराच्या परंपरेप्रमाणे अत्यंत शांततेत निवडणूक पार पडली.

पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगरसेविका सुरेखा भालेकर, विजेता सोबले, वैशाली औटी यांच्यासह 42 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. 2, 11, 13 व 14 या प्रभागांसाठी 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 19 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

अकोले नगरपंचायत निवडणुकीत 13 प्रभागांतून 19 मतदान केंद्रांवर 80.69 टक्के मतदान झाले. दिवसभरात किरकोळ कारणांवरून झालेल्या बाचाबाचीच्या घटनांचा अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार समोर आला नाही. अकोले नगरपंचायत निवडणुक प्रचाराची रणधुमाळी व आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा सोमवारी रात्री 10 वाजता थंडावल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची विकास आघाडी असून काँग्रेस, भाजप, मनसे व माकप हे स्वतंत्र लढत आहेत. अकोले नगरपंचायतीत 1 ते 17 प्रभागातून स्त्र्ााr 6815, पुरुष 6516 असे एकूण 13 हजार 331 मतदार आहेत. यापैकी क्रमांक 4, 11, 13 व 14 या प्रभागांची निवडणूक रद्द झाली आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी 80.20 टक्के मतदान झाले. 12 जागांसाठी 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत यावेळी मोठी चुरस होती. आरोप-प्रत्यारोपामुळे मतदान सुरळीत पार पडणार की नाही याविषयी देखील उत्सुकता होती. मात्र, सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रांवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत अवघे दहा टक्के मतदान झाले होते. मात्र, अकरानंतर मतदान केंद्रांवर हळूहळू गर्दी वाढू लागली. दुपारी मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.