
महापालिकेच्या 38 प्रभागांच्या रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. यामध्ये निवडणूक आयोगाने त्रुटी काढल्या होत्या. त्यामध्ये सुधारणा करत महापालिका आयुक्तांनी अंतिम प्रभागरचनेचा आराखडा पुन्हा निवडणूक आयोगाला सादर केला आहे. 15 दिवसांत अंतिम प्रभागरचना जाहीर होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. नव्या रचनेत तीन सदस्यांचे 38 प्रभाग असून, एकूण 113 सदस्य आहेत.
राज्यातील मुदत संपणाऱया सर्व महापालिकांचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाने प्रथम 2011 च्या तयार जनगणनेनुसार करण्याचे निर्देश दिले होते. राज्य मंत्रिमंडळाने यात 14 टक्के लोकसंख्यावाढ गृहीत धरून रचना करण्याचे निर्देश दिले. सोलापूर महापालिकेत सध्या एकूण 26 प्रभाग, तर 102 सदस्य आहेत.
नव्या निर्णयानुसार एकूण 38 प्रभाग आणि एकूण 113 सदस्य असणार आहेत. आयुक्तांनी गेल्या आठवडय़ात आयोगाला हा आराखडा सादर केला होता. मात्र, त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्यासाठी दोन दिवसांपासून आयुक्त पी. शिवशंकर यांनी मुंबईत ठाण मांडून निवडणूक आयोगाने काढलेल्या त्रुटीमध्ये सुधारणा करत अंतिम प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. 15 दिवसांत अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी कमालीची गुप्तता पाळल्याने प्रभागरचना नेमकी कशी याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेक इच्छुकांमध्ये याबाबत उत्सुकता पसरली आहे. अनेकांनी आयुक्तांकडून याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तो फोल ठरला आहे.































































