Health Tips: हिवाळ्यात मुलांच्या आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, रोगप्रतिकारशक्ती वाढेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडी सुरू झाली असून हिवाळ्यातील वातारण बदलांमुळे शरीराच्या तापमानामध्ये देखील बरेच चढउतार होतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला व अंगदुखी इ. प्रकारचे त्रास होण्याची शक्यता असते. हिवाळा शरीरासाठी जितका चांगला तितका वाईट देखील आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनीच आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच लहान मुलांच्या आहारात प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

वाढत्या थंडीमध्ये नुसते उबदार कपडे घालणे पुरेसे नाही, तर आहारात देखील बदल करणे गरजेचे असते. या ऋतूमध्ये लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थांचा सामावेश करणे आवश्यक आहे, ज्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन आजारपण दूर ठेवण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊ अशा अनेक आरोग्यदायी पदार्थांबद्दल, जे हिवाळ्यात लहान मुलांना खाण्यास दिल्यास फायदा होईल.

बाजरी किंवा ज्वारीची भाकरी : हिवाळ्यात बाजरी व ज्वारी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजरी किंवा ज्वारीची भाकरी साधारणतः वर्षभर खाल्ल्या जाऊ शकतात, परंतु हिवाळ्यात त्या खाण्यासाठी उत्तम असतात. बाजरी ही ‘ग्लुटेन फ्री’ असल्यामुळे गहू आणि तांदळापेक्षा जास्त आरोग्यदायक असते. यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आढळतात, जे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात

आवळा: हिवाळ्यात आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. आवळा अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने मुलांच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. याशिवाय शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होते. ज्यामुळे शरीराला सर्दी-खोकल्यासारख्या आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

हिरव्या भाज्या: आठवड्यातून एक दिवस तरी हिरव्या भाज्या मुलांना आहारात देणे गरजेचे आहे. त्यांना ताजी पालक, मेथी, साग कांदा यांसारख्या ताज्या हिरव्या भाज्या खायला द्या. याशिवाय तुम्ही त्यांना पालक पनीर किंवा पालक भातही आहारात देऊ शकता.

रताळ : रताळे भरपूर पौष्टिक असते. तसेत खायला अतिशय चवदारही असते. हिवाळ्यात रताळी खाल्ल्याने भरपूर ऊर्जा मिळते. रताळ्यामध्ये भरपूर फायबर्स असतात आणि त्यामुळे लहान मुलांना पचनशक्ती वाढवण्यास फायदा होतो. रताळे भाजून त्यावर चाट मसाला लावूनही मुलांना देऊ शकता किंवा गरम रताळ्यावर तूप लावून मुलांना खायला द्यावे.

‍मेवा : सुका मेवा हिवाळ्यात खाल्ल्याने मुलांच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाणही वाढण्यास मदत होते. मेवा हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. मुलांना काजू, बदाम, शेंगदाणे आणि अक्रोड खायला द्या. नट हे मुलांसाठी निरोगी स्नॅक्ससारखे असतात.

हळद : या ऋतूमध्ये मुलांना हळदीचे एक ग्लास दूध प्यायला द्यावे. हळदीचे दूध शरीरात उबदारपणा निर्माण करायला मदत करते तसेच हळदीचे दूध शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. याचे रोज सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. हे शरीराला रोगांशी लढण्याची ताकद तर देतेच तसेच हिवाळ्यातील सर्वोत्तम पेय देखील आहे.

गूळ: हिवाळ्यात गुळाचे सेवन वाढवावे. गुळामध्ये आढळून येणारे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेच, आर्यन, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम आणि फॉस्परस मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. साखरेपेक्षा गूळ आरोग्यदायी आहे. मुलांच्या आहारात गोड पदार्थ म्हणून साखरेऐवजी गूळही देऊ शकता. तसेच फक्त साधा गूळ खाल्ल्यानेही मुलांचे शरीर उबदार राहते. गुळाचा वापर सर्दी आणि खोकल्यावरही फायदेशीर ठरतो. सर्दी झाल्यावर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्याने फायदेशीर ठरू शकतो. याव्यतिरिक्त गूळ ओव्यासोबत खाल्याने सर्दीची समस्या दूर होण्यास मदत होते

अंड: हिवाळ्यात मुलाच्या आहारात दररोज एक उकडलेले अंडे द्यावे. अंड शरीराल उबदार ठेवण्यासोबतच ऊर्जा आणि पोषक तत्त्वेही देण्यास फायदेशीर ठरतं.
उकडलेल्या अंड्यांव्यतिरिक्त, आपण ऑम्लेट बनवून देखील मुलाना खायला देऊ शकतात.

सूप: थंडीच्या दिवसात गरम गरम सूप पिणे अत्यंत फायदेशीर असते. हिवाळ्यात तुमच्या मुलाला ठेवण्यासाठी सूप हा सर्वोत्तम खाद्यपदार्थ आहे. मुलाला सूपमध्ये काही भाज्या द्या आणि ते चवदार आणि पौष्टिक बनवा. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर बाळाला चिकन सूप देणे चांगले.

गाजर: हिवाळ्याच्या दिवसात बाजारात गाजर सहज विकत मिळतात. एक कप गाजरामध्ये 25 कॅलरी, 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 2 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम शुगर, 0.5 ग्रॅम प्रथिने असतात. तसेच यात जीवनसत्त्व ए, के, सी, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आणि आयर्न अशी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे असतात. अँटिऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत असलेले गाजर शारीरिक आरोग्याकरिता अत्यंत गुणकारी मानले जाते.