
>> नरेंद्र बंडबे
कोरोनामुळं जग थांबलं. सर्व काही ठप्प झालं. सर्व काही ब्लेंडेड मोडवर आलं. ऑनलाइन न्यू नॉर्मल झालं. सिनेमा क्षेत्रातही असंच काही घडलं. पण यातही हिंदुस्थाननं बाजी मारली. सर्व काही थांबलेलं असताना हिंदुस्थानी सिनेमा सातासमुद्रापार जाऊन आपला झेंडा फडकवून आला. यासाठी 2021 वर्षातली अनेक उदारहणं देता येतील.
कोरोनामुळं जग थांबलं. सर्व काही ठप्प झालं. सर्व काही ब्लेंडेड मोडवर आलं. ऑनलाइन न्यू नॉर्मल झालं. सिनेमा क्षेत्रातही असंच काही घडलं. पण यातही हिंदुस्थाननं बाजी मारली. सर्व काही थांबलेलं असताना हिंदुस्थानी सिनेमा सातासमुद्रापार जाऊन आपला झेंडा फडकवून आला. यासाठी 2021 वर्षातली अनेक उदारहणं देता येतील. सुरुवात रॉटर्डम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलनं झाली. पी.एस. विनोथराज या नवख्या दिग्दर्शकाच्या पहिल्याच सिनेमानं इथं बाजी मारली. ‘कळंगुल’ अर्थात पेबल्स( 2021) या तामीळ सिनेमानं गोल्डन लायन अवार्ड पटकावला. हा या रॉटर्डम फिल्म फेस्टिव्हलमधला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार आहे. यापूर्वी सनल कुमार ससीधरननं ही किमया करून दाखवली होती. त्याचा ‘सेक्सी दुर्गा’ (2017) या 33 वर्षांनंतर गोल्डन लायन पुरस्कार मिळवला होता. विनोथराजनं ही गॅप भरून काढली आणि 2021 चा गोल्डन लायन हिंदुस्थानात आणला. ही हिंदुस्थानातल्या सिनेमा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब होती. शास्त्रशुध्द सिनेमॅटिक भाषेतला प्युअर सिनेमा असा ‘पेबल्स’चा गौरव करण्यात आला. पेबल्सला हिंदुस्थानी निवड समितीनं ऑस्कर्ससाठी पाठवला. बेस्ट इंटरनॅशनल फिल्म या कॅटेगरीत हा सिनेमा स्पर्धा करत होता. जवळपास 40 आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समधले ऑलिव्ह ब्रान्च पेबल्सच्या पोस्टरवर झळकतायत. यासाठी विनोथराजचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पेबल्सच्या माध्यमातून दिग्दर्शक विनोथराजनं आपली गोष्ट सांगितली आहे. ही गोष्ट जागतिक आहे. हिंदुस्थानातल्या पितृसत्ताक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी आहे. सिनेमातले सब टेक्स्ट अर्थात त्यातल्या सामाजिक आणि राजकीय संदर्भांमुळं जागतिक सिनेमाच्या क्रमवारीत वरच्या पंगतीत जाऊन बसला.
‘पेबल्स’च्या मागोमाग ‘पेड्रो’ (2021) या कन्नड भाषेतल्या सिनेमानं जागतिक पातळीवर भन्नाट काम केलं. पेड्रो (2021) चा दिग्दर्शक आहे नतेश हेडगे. नतेशनं आपल्या इलेक्ट्रिशियन वडिलांनाच सिनेमाचं पेड्रो हे पात्र करायला दिलं. सिनेमातले बहुतांश कलाकार एम्योच्युअर आहेत. म्हणजेच पहिल्यांदाच कॅमेरासमोर उभे राहणारे साधे गावकरी आहेत. ग्रामीण भागातली गोष्ट असल्यानं स्थानिक गावकऱ्यांना जागतिक गोष्ट नतेशनं सांगितली आहे. दक्षिण कोरियातल्या बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसहित लंडन या मानाच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमा दाखवण्यात आला. व्हेरायटी, हॉलीवूड रिपोर्टर्स, द न्यूयॉर्करसारख्या सिनेमावर लिहिणाऱ्या महत्त्वाच्या न्यूज पेपर्स आणि मॅगझीनमध्ये पेड्रो सिनेमावर भरभरून लिहिलं गेलं. त्याची वाहवाही झाली. मोंट्गोफेअर डिर्जेन्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमाचे हीरो म्हणजेच गोपाळ हेगडे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी रांगा लागल्या. पेड्रो सिनेमा कर्नाटकातल्या अगदी आतल्या गावात घडतो. या अगदी आतल्या गावावर ही देशातल्या राजकारणाचा परिणाम झाला. झुंड आणि झुंडशाही कशी तयार होते याची प्रक्रिया पेड्रोत दाखवण्यात आलीय. राजकीय लोक आपल्या फायद्यासाठी झुंड तयार करता आणि सर्वसामान्य माणूस या झुंडीचा बळी ठरतो. असं आणि बरंच काही ‘पेड्रो’त दिसतं. आपल्या भवतालाशी असणारं हे कनेक्शन अनेकदा फार अस्वस्थ करतं. पण जिथं सगळा देशच अस्वस्थ आहे, आम आदमी सरळ रेषेत जगेल याची शाश्वती नाहीच. त्यामुळं पेड्रो हा नतेशचा सिनेमा हिंदुस्थानात बनलेला यंदाचा सर्वात महत्त्वाचा सिनेमा ठरतो.
मळ्याळम भाषेतला दिग्दर्शक डॉन पलाथरनं या वर्षात दोन महत्त्वाचे सिनेमे दिले. ते सिनेमा क्षेत्रातले प्रयोग आहेत. लॉक डाऊन झालं. जग थांबलं, पण क्रिएटिव्हिटी थांबत नाही. कारण आपण विचार करायचे थांबत नाही. या लॉक डाऊनमध्ये एक पूर्ण सिनेमा झाला आणि त्यानं आधुनिक कुटुंब व्यवस्था, सध्याचे हिंदुस्थानातले स्त्री-पुरुष संबंध यावर भाष्य केलं. ते जगभरातल्या प्रेक्षकांना एवढं आवडलं की त्यांनी डॉन पलाथरच्या ‘एव्हरीथिंग इज सिनेमा’ (2021) ला डोक्यावर घेतलं. डॉक्यु-फिचर फिल्म गटात मोडणारा हा सिनेमा आहे. आधुनिक तंत्रांचा वापर करत सिनेमातली साधी गोष्ट सांगण्यात आलीय. ‘एव्हरीथिंग इज सिनेमा’च्या माध्यमातून सुरू झालेला त्याचा आणि तिचा संवाद डॉननं ‘संथोशाथिंथे ओन्नम रहस्यम’ (2021) या सिनेमात आणखी वेगळ्या पध्दतीनं घडवला आहे. ‘एव्हरीथिंग इज सिनेमा’मध्ये एका स्ट्रगलर दिग्दर्शक नवरा आणि त्याची यशस्वी फिल्म अभिनेत्री बायको या दोन पात्रातला संवाद आहे. तो फेमिनिजम, सिनेमातले इजम, ट्रेंड आणि त्यानंतर सेक्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि स्त्रियांचे हस्तमैथुन असे अनेक विषय हाताळले आहेत. यातला चेरीस म्हणजे कधीच पडद्यावर न दिसणारा सिनेमाचा हीरो फक्त आवाजानं प्रेक्षक आणि त्याच्या बायकोशी संवाद करतोय. ही प्रयोगशीलताच सिनेमाला मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वाधिक दाद मिळवून गेली. रशियात एव्हरीथिंग इज सिनेमाचा एक फॅनक्लबच तयार झालाय. तर दुसरीकडे ‘संथोशाथिंथे ओन्नम रहस्यम’ (2021) या सिनेमातली जोडी नको असलेल्या प्रेगन्सीबद्दल बोलतेय. गर्भपात, त्यावरचा स्त्राr आणि पुरुषाचा दृष्टिकोन असं बरंच काही या सिंगल फ्रेममधल्या गाडीतल्या प्रवासात घडतं. हा संवादच फार इंटरेस्टिंग आहे. जो प्रेक्षकांना बांधून ठेवतो.
आपले मराठी सिनेमे ही आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सर्किटमध्ये भारी गाजले. ‘कारखानीसांची वारी’ हा मंगेश जोशी या दिग्दर्शकाचा सिनेमा सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय. तो लंडन, टोकियो असं एक एक करत अनेक फिल्म फेस्टिव्हल काबीज करत आला. तर निखिल महाजनचा गोदावरी पॅनडातल्या व्हॅक्योर इंडियन फिल्म फेस्टिव्हल इथं दाखवण्यात आला. शिवाय गोव्यात झालेल्या इफ्फी अर्थात इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे महत्त्वाचे पुरस्कार गोदावरीनं पटकवाले. इथं ‘कारखानीसांची वारी’ या सिनेमाबद्दल आवर्जून लिहावंसं वाटतं. कारण त्यातले सबटेक्स्ट हे जागतिक आहेत.बाहेरून अस्सल हिंदुस्थानी एकत्र कुटुंबपध्दती म्हणून ओळखली जाणारी कुटंबे किती विभक्तीच्या मार्गावर आहेत याची जाणीव होते.
या व्यतिरिक्त इथं एका अस्सल हिंदुस्थानी डॉक्युमेन्ट्रीबद्दल बोलणं गरजेचं आहे. ‘रायटिंग विथ फायर’ (2021) ही डॉक्युमेन्ट्री सध्या जगभरात हिंदुस्थानचा झेंडा उंचावतेय. खबर लहरिया या न्यूज पोर्टलमध्ये रिपोर्टर म्हणून काम करणाऱ्या दलित-पददलित महिलांची गोष्ट जागतिक स्तरावर खूप गाजली आहे. ‘खबर लहरिया’ पत्रकारितेतली महत्त्वाची चळवळ आहे. बुंदेली, भोजपुरी, अवधी, बाजीक्का हिंदुस्थानी बोलीभाषेत आणि इंग्रजीत खबर लहरियाच्या बातम्या असतात. इथं काम करणाऱ्या रिपोर्टर महिला दलित-पददलित आहेत. त्या गर्दीत उभ्या राहून आपलं वार्तांकन करतात. त्या वार्तांकनातून समाजात उपेक्षित असलेल्यांचा आवाज त्या बुलंद करतात. या कामासाठी खबर लहरियाच्या संपादक कविता देवी यांना चमेलीदेवी जैन हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. खबर लहरिया या पोर्टलचा अभ्यास करताना रिंतू थॉमस आणि सुश्मित घोष या दिग्दर्शक जोडीला ‘रायटिंग विथ फायर’ या डॉक्युमेन्ट्रीची कल्पना सुचली. आज ‘रायटिंग विथ फायर’ ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेन्ट्री पॅटेगरीत नामांकित 15 डॉक्युमेन्ट्रीत खांद्याला खांदा लावून उभी आहे. ऑस्कर हा काय जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार नाही. पण तिथं हिंदुस्थानात सुरू असलेल्या जाती-पडजाती आणि इतर सामाजिक प्रश्नांची उकल करणारी ही देशातली महत्त्वाची डॉक्युमेन्ट्री आहे हे मान्य करायलाच हवं.
(लेखक फ्रिप्रेस्की या आंतरराष्ट्रीय सिनेमा समीक्षक संघटनेचे सदस्य आहेत)
– [email protected]





























































