
धमकीच्या त्रासाला कंटाळून भोजपुरी अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरज परदेशी आणि प्रवीण वाळिंबेला आंबोली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. सूरज हा मुख्य सूत्रधार असून त्याने एनसीबीचा अधिकारी असल्याचे भासवून ड्रग्जच्या केसमध्ये अभिनेत्रीला अटक करू नये म्हणून 40 लाखांची मागणी केली होती. या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
संजना ऊर्फ सलमा खातून ही चित्रपटात करीअर करण्यासाठी मुंबईत आली होती. तिने काही भोजपुरी चित्रपटांत काम केले होते. संजना ही जोगेश्वरी येथे मैत्रिणीसोबत राहत होती. गेल्या आठवडय़ात संजना ही तिच्या मित्रांसोबत सांताक्रुझ येथील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. पार्टी सुरू असतानाच सूरजसोबत चार जण तेथे आले. त्याने आपण एनसीबीचे अधिकारी असल्याचे भासवले. पार्टीमध्ये ड्रग्जचे सेवन केले असून तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली जाणार असल्याचे भासवले. कारवाई होणार या भीतीने संजना आणि तिचे मित्र घाबरले. त्यानी कारवाई करू नये म्हणून सूरज आणि त्याच्या साथीदारांना विनंती केली. विनंती केल्यानंतर सूरजने संजनाकडे कारवाई रोखण्यासाठी 40 लाख रुपये मागितले.
40 लाख रुपये रक्कम जास्त असल्याने संजनाने 20 लाख रुपये देण्याचे मान्य केले. पैसे दिल्यानंतर त्या सर्वांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर अधिक पैशासाठी संजनाला फोन येऊ लागले. पैशासाठी तिला धमकी दिली जात होती. धमकीच्या त्रासाला कंटाळून गुरुवारी संजनाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या मित्राच्या निदर्शनास आला. त्याने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. काही वेळातच अंबोली पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी संजनाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संजनाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तिच्या मित्राचा जबाब नोंदवून घेतला. मित्राच्या जबाबानंतर संजनाच्या आत्महत्येचा प्रकार समोर आला. घडल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करू तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सूरज आणि प्रवीणला आसनगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सूरज हा मुख्य सूत्रधार त्याने हा कट घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. संजनाकडून घेतलेले 20 लाख रुपये त्याने कोणाला दिले, यापूर्वी सूरजने एनसीबीच्या कारवाईची भीती दाखवून कोणाकडून पैसे उकळले होते का याचा तपास आता आंबोली पोलीस करत आहेत.



























































