
कोरोना व ओमायक्रोनच्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. नवीन लसी व औषधे येत आहेत. मास्क, लसीकरण, शारीरिक अंतर याचा अवलंब केला तर पुढील वर्ष आरोग्यदायी असेल, असा विश्वास राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दै. ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला.
संपूर्ण देशासह राज्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू होणार आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स व सहव्याधी असलेल्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बुस्टर डोसही दिला जाणार आहे. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, पण तरीही सर्वांचे लसीकरण पूर्ण करावे लागेल, मास्क लावावे लागतील. निर्बंध, स्वयंशिस्त पाळावीच लागेल. त्या दृष्टिकोनातून पुढील वर्ष काळजीपूर्वक रहावे लागेल. सावधानता, सतर्कता, अतिशय डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागेल. कोविड अजून आपल्याबरोबर राहील, पण त्यामध्ये परिवर्तन होईल. पुढील वर्षी कोविड आजार हा मलेरिया, डेंग्यूसारखा आजार होईल ही आशा आहे. ओमायक्रोन तुलनेत सौम्य आहे, पण तरीही ओमायक्रोनच्या विषाणूचा अतिशय झपाटय़ाने प्रसार होतो. कोविड होऊन गेला असेल, लसीचे दोन डोस घेतले असतील तरीही ओमायक्रोनपासून सावधगिरी बाळगावीच लागेल. मुले, लस न घेतलेल्या व्यक्ती व ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांमधूनच कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल, असे डॉ. शशांक जोशी म्हणाले.
विद्यार्थ्यांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण
आता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण होईल. मग बारा व नंतर दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना डोस असे टप्प्याटप्प्याने लसीकरण होईल. पुढील तीन ते सहा महिन्यांत लसीकरण चालू राहील. सहव्याधींमुळे रोगप्रतिकारशक्ती खालावली असेल तर वैद्यकीय सल्ल्याने त्यांना बुस्टर डोस दिला जाईल अशी नियमावली तयारी केली आहे.
निष्काळजीपणा घातक
कोणत्याही लाटेचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सक्षम आहे. आरोग्य यंत्रणा जय्यत तयारीत आहे. मात्र लोकांनी निष्काळजीपणा केला तर घातक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोविडमुळे एकही मृत्यू नको, तीव्र आजार किंवा रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज भासू नये. कोविडच्या रुग्णांवर घरच्या घरीच उपचार झाले पाहिजेत ही आपली मनोकामना आहे.
– डॉ. शशांक जोशी, सदस्य कोविड टास्क फोर्स





























































