सलग सुट्ट्यांमुळे देशभरातून हजारो साईभक्त शिर्डीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्टय़ांमुळे देशभरातील हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. सकाळपासूनच साईमंदिराच्या दर्शनरांगा भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर साईमंदिर प्रशासनाने मंदिराच्या दर्शनवेळेत बदल केला आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना प्रवेश दिला जाणार नसून, सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतच भाविकांना साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.

राज्य सरकारने घटस्थापनेपासून काही अटी-शर्तींवर धार्मिक स्थळे खुली करण्याचा आदेश दिला होता; परंतु सध्या ‘ओमायक्रॉन’चा धोका लक्षात घेता, राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री 9 वाजेनंतर श्री साईबाबांचे समाधिमंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. रात्री 10.30 वाजताची ‘श्रीं’ची शेजारती व पहाटेची 4.30 वाजताची काकड आरती नियमित होणार असून, याकरिता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तर, संस्थानचे श्री साई प्रसादालय, लाडू विक्री काऊंटर, कॅण्टीन आदी सुविधाही नऊ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे बानायत यांनी सांगितले.

साईमंदिराजवळ बेवारस बॅग

दुपारी साईमंदिराजवळ बेवारस बॅग आढळून आली होती. साईमंदिराच्या दोन नंबर गेटजवळ ही बॅग आढळल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने बॅगची तपासणी केली. मात्र, यात आक्षेपार्ह काही सापडले नाही. या बॅगमध्ये कपडे आणि औषधांच्या बाटल्या असल्याचे समोर आले आहे. एखादा साईभक्त बॅग विसरला असण्याची शक्यता असून, जास्त वेळ बॅग पडून असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बॅगची तपासणी करण्यात आली.