
धुळे, नंदुरबारमधील सरकारी कामे घेणारे ठेकेदार, बिल्डर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, नातलगांच्या घरे व कार्यालयांवर आयकर खात्याने छापे टाकले. चार-पाच दिवस चाललेल्या या धाडसत्रात संबंधितांचे नाशिक कनेक्शन उघड झाल्याने नाशिकमध्ये तिघांवर छापे टाकण्यात आले. या संपूर्ण कारवाईत अडीचशे कोटींची बेहिशेबी मालमत्ता चव्हाटय़ावर आली. सुमारे साडेसहा कोटी रुपये रोख रक्कम, सोने, हिरे, मोत्याचे सुमारे सहा कोटींचे दागिने हस्तगत केल्याचे समजते.
नाशिक, धुळे आणि गुजरात मार्गे आयकरच्या अधिकारी, कर्मचाऱयांचे दीडशे जणांचे पथक मंगळवारी, 21 डिसेंबर रोजी रात्री नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. तेथील बिल्डर, बांधकामाची कामे घेणारे ठेकेदार अशा तेराहून अधिक बडय़ा व्यावसायिकांच्या घरी व कार्यालयात एकाचवेळी धाडसत्र सुरू करण्यात आले. कागदपत्रांची छानणी करून त्यांचे नातेवाईक व भागिदार यांच्या नाशिक व धुळ्यातील प्रत्येकी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या धाडसत्रात साडेसहा कोटींची रोकड मिळाल्याचे समजते. सहा कोटींच्या दागिन्यात सोने, हिरे, मोत्याच्या दागिन्यांचा समावेश असल्याचे समजते. या धाडसत्राबाबत आयकर खात्याकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याने हस्तगत केलेल्या मालमत्तेचा निश्चित आकडा समजू शकला नाही.
डांबर चलनाने केला घोळ
काही दिवसांपूर्वी मुंबईत काही ठेकेदारांवर आयकरचे छापे पडले होते. त्यांच्याकडील कागदपत्रात काही डांबर खरेदीचे चलन मिळाले. हे चलन नंदुरबारमधील ठेकेदाराचे होते, त्यावरून माग काढून आयकरने उत्तर महाराष्ट्रात छापे टाकल्याची चर्चा होती. अनधिकृत डांबर चलनाने घोळ केल्याचे बोलले जात आहे.




























































