नसिरुद्दीन शाह म्हणाले… आम्ही 20 कोटी आहोत; घाबरणार नाही, तर लढू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु आम्ही (मुस्लिम) 20 कोटी आहोत. आम्ही घाबरणार नाही तर लढू, असे वादग्रस्त वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केले आहे. मुघल आक्रमक आणि अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माणमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, शाह यांच्या वक्तव्यावरून वाद वाढण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी हरिद्वार येथे धर्मसंसद झाली होती. यासंदर्भात एका मुलाखतीत विचारले असता, ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. देशात एका प्रकारे गृहयुद्धसारखे वातावरण निर्माण केले जात आहे. मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही 20 कोटी लोक आहोत. जर कोणते अभियान सुरू असेल तर त्याचा जोरदार विरोध होईल आणि लोकांचा संताप बाहेर पडेल, असे शाह म्हणाले.

20 कोटी लोकसंख्येला अशाप्रकारे संपवण्याची भाषा केली जाऊ शकत नाही. हे लोक लढण्यास तयार आहेत. कारण आमच्या पिढय़ा येथे गेल्या. आमचा जन्म येथे झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

मुघलांचा इतिहास गौरवशाली

नसिरुद्दीन शाह यांनी चक्क मुघलांचे कौतुक केले. मुघलांनी अत्याचार केले असे खोटे सांगितले जाते. मुघल हे अत्याचारी, आक्रमक नाही, तर राष्ट्रनिर्माता होते. देशासाठी त्यांचे खूप मोठे योगदान असून, ऐतिहासिक स्मारके आणि गौरवशाली इतिहास मुघलांनी दिला आहे. संगीत, नृत्य, चित्रकला याची परंपराही मुघलांनी दिली, असे त्यांनी सांगितले.