
>> डॉ. मंजिरी भालेराव
धाराशीव जिल्ह्यात धाराशीवच्या ईशान्येस 32 किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले, आज तुलनेने फारसे प्रसिद्ध नसलेले पण प्राचीन काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले हे नगर म्हणजे तेर किंवा प्राचीन तगरपूर. व्यापाराबरोबरच राजकीयदृष्ट्यासुद्धा हे एक महत्त्वाचे नगर असावे. त्याचे अभिलेखीय उल्लेख ‘तगरपूर’ असे दिसतात. अगदी प्राचीन काळ ते मध्ययुग या काळात सतत समृद्धीच्या शिखरावर राहिलेल्या या गावाचे रूप आज जरी पूर्ण बदलले असले तरी त्या समृद्धीच्या पाऊलखुणा लिखित, भौतिक आणि मौखिक पुराव्यांनी ठायी ठायी आढळतात.
प्राचीन महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग असलेली अनेक नगरे होती हे आतापर्यंत आपण पहिलेच आहे; परंतु ज्यांचा परदेशी प्रवासवर्णनात उल्लेख आहे अशी त्या मानाने कमी आहेत. पण ‘तगर’ म्हणजे आज ‘तेर’ नावाने प्रसिद्ध असलेले नगर इ.स.च्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या काही प्रवासवर्णनात उल्लेखिलेले दिसते. धाराशीव जिह्यात धाराशीवच्या ईशान्येस 32 किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले, आज तुलनेने फारसे प्रसिद्ध नसलेले पण प्राचीन काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले हे नगर म्हणजे तेर किंवा प्राचीन तगरपूर. व्यापाराबरोबरच राजकीयदृष्ट्यासुद्धा हे एक महत्त्वाचे नगर असावे. त्याचे अभिलेखीय उल्लेख ‘तगरपूर’ असे दिसतात.
तेरच्या प्राचीनत्वाचे पुरावे गावात ठिकठिकाणी विखुरल्याचे ब्रिटिश काळापासून अनेक लोकांनी नोंदवून ठेवले होते. स्थानिक लोकांनी अनेक प्रकारचे अवशेष गोळा केले. त्यामधल्या श्री. रामलिंगप्पा लामतुरे यांनी केलेल्या संग्रहाचे रुपांतर सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि संग्रहालये खात्याच्या तेर येथील संग्रहालयात झाले आहे. येथील पुरावशेष नदीच्या दोन्ही तीरांवर एकूण नऊ पांढरीच्या टेकाडांवर होते. या गावात वेळोवेळी मिळालेले अवशेष पाहून येथे निरनिराळय़ा संस्थांनी, विद्यापीठांनी महाराष्ट्र शासनातर्फे उत्खनने केली. या उत्खननांमुळे तेरचा सांस्कृतिक इतिहास, मौर्यपूर्व कालखंडापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत, एकूण पाच खंडांमध्ये विभागता आला.
येथील उत्खननात मौर्य काळाचे व्यवच्छेदक लक्षण असणारी उत्तरेतील काळ्या रंगाची झिलईयुक्त भांड्यांची खापरे (Northern Black Polished Ware) सापडली. सातवाहनकालीन वस्तीचाही पुरावा उपलब्ध झाला. त्यामध्ये विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची शोषणकुंडे, सातवाहन राजांची नाणी, पक्व मृदा आणि केओलिनच्या उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी येथे सापडले. याव्यतिरिक्त घरांचे, प्राचीन बौद्ध स्तूपांचे अवशेषही सापडले. या स्तूपाचा व्यास 26 मी. होता. त्यामुळे सातवाहन काळात तेर हे बौद्धधर्माचे मोठे केंद्र होते असे लक्षात आले. उत्कृष्ट कोरीवकाम असलेले स्तूपाच्या कठड्यांचे खांब व इतर शिल्पे तेथील वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहेत. याशिवाय सातवाहन काळातील नाणी, मृत्तिकामूर्ती, मृत्पात्रे, मणी आणि विशेषतः रोमन मृत्पात्रे व पुतळ्या उपलब्ध झाल्या आहेत. तसेच येथे सापडलेल्या वस्तूंमध्ये एक हस्तिदंताची 12 सेमी. उंच मनमोहक कोरीव स्त्री मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशाच तऱ्हेची हस्तिदंती स्त्री मूर्ती इटलीतील ज्वालामुखीत (इ. स. 79) नष्ट झालेल्या पाँपेई या प्राचीन शहराच्या उत्खननात मिळालेली आहे (1938). यावरून तेर हे एक कला निर्मितीकेंद्र होते व त्याचा रोमन नगराशी व्यापारी संपर्क होता हे सिद्ध झाले आहे. या दोन्ही हस्तिदंती मूर्ती या त्या काळात वापरात असलेल्या ब्राँझच्या आरशाचे दांडे आहेत.
नंतर केलेल्या उत्खननामध्ये तेरभोवती केलेल्या लाकडी तटबंदीचे अवशेष निदर्शनास आले. सातवाहनांच्या राज्यात तीस तटबंदीयुक्त नगरे होती, असा प्लिनी या इ. स. पहिल्या शतकातील रोमन लेखकाने केलेला उल्लेख यासंदर्भात महत्त्वाचा ठरतो. येथील उत्खननातील संपूर्ण पुराव्यांवरून सातवाहनांच्या प्रारंभीच्या काळात तेर तटबंदीयुक्त नगर होते हे लक्षात येते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीअन सी (इ. स. पहिले शतक) या ग्रंथात तेरचा उल्लेख आहे. त्या वेळी तगरनगरातून विविध प्रकारचे उत्कृष्ट कापड बॅरीगाझा म्हणजे भरूकच्छ म्हणजे आजचे गुजरातमधील भडोच येथे निर्यात केले जाई. त्याचप्रमाणे तगरमध्ये किनारपट्टीवरून विविध वस्तू आयात केल्या जात, असे पेरिप्लसचा ग्रंथकर्ता म्हणतो. पेरिप्लसव्यतिरिक्त प्राचीन तगरनगर हे इ. स. पहिल्या शतकातील एक व्यापारी पेठ असल्याचा उल्लेख अलेक्झांड्रियाचा भूगोलतज्ञ टॉलेमी (इ. स. सु. 90–169) याच्या प्रवास वर्णनात येतो.
ऐतिहासिक काळातील अवशेषांमध्ये तेर येथील त्रिविक्रम आणि उत्तरेश्वर या विटांच्या मंदिरांचा समावेश होतो. त्रिविक्रम मंदिर हे चापाकृती आकाराचे आणि गजपृष्ठाकृती छताचे आहे, तर उत्तरेश्वर मंदिर हे द्राविड शैलीचे आणि विटांनी बांधलेले मंदिर आहे. काही अभ्यासक त्याचा काळ इ.स. दुसरे ते पाचवे शतक या दरम्यानचा मानतात, तर काही इ.स.च्या 7 व्या शतकातील मानतात. ही वास्तू महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन वास्तूंपैकी एक असल्याचे मानले जाते. याच्या आतली विष्णूची त्रिविक्रमाची मूर्ती अतिशय भव्य आणि देखणी आहे. उत्तर दिशेचा ईश्वर म्हणजे उत्तरेश्वर या मंदिराची द्वारशाखा (दरवाजाची चौकट) लाकडी होती आणि त्यावर अतिशय सुंदर कोरीव काम होते. त्यावर ललाटावर ब्रह्मा, विष्णू, शिव आणि लकुलीश यांच्या मूर्ती कोरल्या असून भोवती वाद्य वाजवणारे गण दाखवले आहेत. तसेच वेलबुट्ट्या, विविध प्राणी व मानवी आकृत्या यांनी ती अलंकृत केली आहे. सध्या ही तेर येथीलच लामतुरे संग्रहालयात ठेवली आहे. उत्तरेश्वर आणि काळेश्वर ही मंदिरे इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकातील राष्ट्रकूट काळातील असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्याच्या विकासातील अतिशय महत्त्वाचे टप्पे तेर येथील या दोन मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. पूर्व मध्ययुगीन कालातील ही तेरची समृद्धी या वस्तूंच्या अवशेषांवरून लक्षात येते.
पुढे शिलाहार या राजवंशांच्या कोरीव लेखांत तगरनगरीचा उल्लेख येतो. ‘तगरपुरपरमेश्वर’ आणि ‘तगरपुरवराधीश्वर’ ही यासंदर्भात उल्लेखनीय आहेत. उत्तर कोकण व कोल्हापूर-सातारा या जिह्यांतील प्रदेशावर राज्य करणारे शिलाहार ‘तगरपुरवराधीश्वर’ असे आपले अभिमानाने वर्णन करतात. याचा अर्थ हे एक तर तगर नगरीमधले असावेत किंवा तेथे ते काही काळ राज्य करीत असावेत. त्यांनी आपले राज्य जरी पश्चिम महाराष्ट्रात केले असले तरी त्यांनी या सुप्रसिद्ध आणि वैभवशाली नगरीशी असलेला आपला संबंध सतत अधोरेखित केलेला दिसून येतो. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी तेर परिसरात सापडलेल्या विविध पुराभिलेखांच्या आधारे असे अनुमान काढले आहे की, हे नगर इ. स. सातवे शतक ते इ. स. अकराव्या शतकापर्यंत ‘तगर’ या नावाने परिचित होते, तर सोळाव्या शतकातील अभिलेखात तसेच फार्सी ताम्रपटानुसार (इ. स. 1659) ही नगरी ‘तेर’ म्हणून ओळखली जात होती.
आज तेर गावाच्या सीमेवर हिंगुळजा देवीचे एक मंदिर आहे. या देवीचे मूळ स्थान हे बलुचिस्तानात आहे हे आपल्याला माहीतच आहे; पण व्यापार करणाऱया लोकांची देवी म्हणून ती हिंदुस्थानात अनेक ठिकाणी त्यांच्याबरोबर गेलेली दिसते. आज जरी हे मंदिर मध्ययुगातील असले तरी ते कधी तरी मध्ययुगाच्या सुरुवातीच्या आधी या व्यापारी केंद्रावर आलेल्या भक्तांबरोबर इथे येऊन, नंतर इथेच स्थायिक झाली असे दिसते. यावरून तेरच्या समृद्धीत भर घालणारे लोक हिंदुस्थानच्या विविध भागांतून इथे आले होते हे सहज लक्षात येते. त्यामुळे अगदी प्राचीन काळ ते मध्ययुग या काळात सतत समृद्धीच्या शिखरावर राहिलेल्या या गावाचे रूप आज जरी पूर्ण बदलले असले तरी त्या समृद्धीच्या पाऊलखुणा ठायी ठायी आढळतात.
पुढे 2015 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. माया पाटील यांनी येथे उत्खनन केले. त्यात सातवाहन काळातील विविध वस्तू व वास्तूंव्यतिरिक्त प्राचीन तगर नगरीभोवती असणाऱ्या लाकडी तटबंदीचे अवशेष पुन:श्च मिळाले. या उत्खननात त्यांना एक खूप महत्त्वाचा पुरावा मिळाला, तो म्हणजे एका मातीच्या भांड्यात तांदूळ आणि मुगाच्या डाळीचे जळलेले अवशेष सापडले. त्यावरून डॉ. माया पाटील यांनी असा अंदाज केला की, आजच्या महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला मुगाच्या डाळीची खिचडी हा पदार्थ प्राचीन काळीसुद्धा स्थानिक लोकांच्या आहाराचा भाग असावा.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत.) [email protected]



























































