
देशाला गेल्या दोन वर्षांपासून विळखा घालून बसलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. या विषाणूचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनमुळे संसर्गाचा वेग वाढला असून गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजार 553 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
या नोंदीसोबत देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 801 इतकी झाली आहे. देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 1525 इतकी झाली आहे. तर 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. काही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यु आणि कलम 144 लागू करण्यात आलं आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून सावधानतेचा इशारा दिला आहे.
ओमायक्रॉनच्या संसर्गाने आलेल्या रुग्णवाढीमुळे येत्या काळात आरोग्य सेवांवर ताण पडू शकतो. त्यामुळे छोट्या छोट्या पातळ्यांवर शिफ्ट पद्घतीची रुग्णालयं बनवण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
तसंच, राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी 24 तास रॅपिड अँटिजेन टेस्टिंग बूथ बसवावेत, असा सल्ला केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनांना दिला आहे. ताप, घशाची खवखव, जुलाब, श्वास फुलणे इत्यादी समस्या असणाऱ्यांची कोरोना चाचणी करावी, असेही आदेश केंद्राकडून जारी करण्यात आले आहेत.



























































