पाटण तालुक्यात गव्यांचा उच्छाद, शेतकरी त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मणदुरे परिसरात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वर्षभर राबून काबाडकष्ट करून वाढवलेली पिके गव्यांकडून फस्त केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

वन विभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मणदुरे भाग हा डोंगर व झाडे-झुडपाचा असल्यामुळे रानडुक्कर, गवे इत्यादी वन्य प्राणी इथे नेहमीच वावरताना आढळतात. या वन्यजीवांना डोंगरांमध्ये पाण्याची सोय नाही. या डोंगराच्या पायथ्याला ओढा व नदीचे पाणी असल्यामुळे त्या नजीकच गहू, शाळू, मका, ऊस इत्यादी पिके शेतकरी घेत असतात.

दिवसभर जंगलात वावरणारे हे गवे, रात्रीच्या वेळी आपला मोर्चा पिकाकडे वळवतात, अनेक शेतकरी आपल्या पिकाची रात्रभर राखण करतात. परंतु एखाद्या दिवशी राखणीला जाण्यास उशीर झाला तर, हे गवे एका रात्रीत एक एकर ते दीड एकर पिकाचे क्षेत्र फस्त करतात.

अनेक शेतकऱ्यांनी शेताभोवती तारेचे कुंपण उभारले आहे, मात्र याचा उपयोग होत नाही. त्यामुळे गव्याच्या त्रासाला शेतकरी वैतागले आहेत. तरी वनविभागाने याची वेळीच दखल घेऊन, त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.