
बेरोजगारीसह कर्जबाजारीपणाला कंटाळून अभियंता असलेल्या मुलाने वृद्ध आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन तिचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास धनकवडीतील अक्षय गार्डन सोसायटीत घडली.
मुलाने आईला औषधांचा ओव्हर डोस दिल्यानंतर त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून दोरीने गळा आवळून जीव गेल्याची खात्री केली. त्यानंतर त्याने खोलीच्या छताला गळफास घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी मुलाने नातेवाइकाला मेसेज केल्यामुळे घटना उघडकीस आली.
निर्मला मनोहर फरताडे (76) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गणेश मनोहर फरताडे (42, रा. अक्षय गार्डन सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेशचा मावसभाऊ शोनित सावंत (35) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आईच्या औषधावर होणारा खर्च आणि नोकरी नसल्याने गणेशवर कर्जही झाले होते. त्याने शेअर मार्केटमध्येही गुंतविलेल्या रकमेवर तोटा झाल्यामुळे तो नैराश्यात गेला होता.




























































