
सांगली महापालिका क्षेत्रात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झाली. सोमवारी पहिल्याच दिवशी या वयोगटातील 569 लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेतले. त्यामुळे हा प्रतिसाद पाहता उद्या मंगळवारपासून महापालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत.
शासनाच्या सूचनेनुसार सोमवारपासून महापालिका क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थी संख्या 20 हजारांच्या आसपास आहे. यासाठी सांगलीतील जामवाडी, हनुमाननगर, साखर कारखाना तर मिरज इंदिरानगर आणि मिरज अर्बन या पाच आरोग्य केंद्रांत पहिल्या दिवशी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती. सोमवारी पहिल्याच दिवशी या पाच केंद्रावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी पाच आरोग्य केंद्रांवर 569 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. हा प्रतिसाद पाहता मंगळवारपासून महापालिकेच्या उर्वरित सर्वच आरोग्य केंद्रावर 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची सोय करण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेशही आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. शिवाय शाळा आणि शिक्षण संस्थांनीसुद्धा पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
लसीकरणाला पश्चिम महाराष्ट्रातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नगर जिह्यातील 124 केंद्रांवर लसीकरण सुरू
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेला किशोरवयीनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही ठिकाणी तर लसीकरणासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. या मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे.
नगर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिह्यात 124 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी 2 लाख 38 हजार 943 इतकी मुलांची संख्या गृहीत धरण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिह्यातील 98 प्राथमिक आरोग्य केंद्र, 26 ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात हे लसीकरण करण्यात येत आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (दि.1) सुरू करण्यात आली आहे. तसेच, प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावरही नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगर शहरात मनपा आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेस सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान यांच्या उपस्थितीत तोफखाना आरोग्य केंद्र लसीकरणास प्रारंभ झाला. तर, उपमहापौर गणेश भोसले यांच्या उपस्थितीत जिजामाता आरोग्य केंद्र येथे लसीकरणास सुरुवात करण्यात आली. शहरातील महात्मा फुले आरोग्य केंद्र माळीवाडा, मुकुंदनगर आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र, जिजामाता आरोग्य केंद्र भोसले आखाडा, तोफखाना आरोग्य केंद्र, सिव्हील आरोग्य केंद्र टीव्ही सेंटर, बीडीसीडी गुणे आयुर्वेद कॉलेज, नागापूर नागरी आरोग्य केंद्र या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह कॅण्टोन्मेंट बोर्ड व फिरोदिया महाविद्यालय, अशा दहा केंद्रांवर मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे.
मनपा आरोग्य विभागाच्या वतीने शहरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 15 ते 18 वयोगटातील सुमारे 19 हजार मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. या लसीकरण मोहिमेसाठी मनपा आरोग्य विभागाला 20 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. याबाबतची माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली.
कोल्हापुरात 9318 विद्यार्थ्यांचे लसीकरण
15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयातच लसीकरणास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी जिह्यात 9 हजार 318 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी फारुख देसाई यांनी दिली.
कोल्हापूर जिह्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजपासून लसीकरण सत्रे सुरू करण्यात आली. 2007 पूर्वी जन्मलेले विद्यार्थी लसीकरणास पात्र आहेत. तर विवेकानंद कॉलेज व कमला कॉलेज येथील लसीकरण केंद्रांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देत लस घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, जिह्यात आज अखेर 18 वर्षांवरील 92 टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस व 68 टक्के लाभार्थ्यांना दुसऱया डोसचे लसीकरण करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.
साताऱ्यातील गुरुकुल स्कूल पहिल्याच दिवशी संपूर्ण लसवंत
पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम आज सातारा जिह्यात दमदारपणे सुरू झाली. सातारा येथील गुरुकुल स्कूलने पहिल्याच दिवशी 100 टक्के लसीकरण करण्याचा बहुमान मिळवला आहे. आता ही मोहीम संपूर्ण जिल्हाभर नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जाणार आहे.
सातारा जिह्यात सर्व आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात ही मोहीम राबवली जात आहे. आज पहिल्याच दिवशी सातारा येथील गुरुकुल स्कूलने शंभर टक्के लसीकरणाचा बहुमान प्राप्त केला. या शाळेतील 15 ते 18 वयोगटातील सर्व 165 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती स्कूलचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी या कामगिरीबद्दल गुरुकुल स्कूल परिवाराचे कौतुक केले आहे. दरम्यान, सातारा जिह्यात एकूण लसीकरणामध्ये पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 93 टक्क्यांवर, तर दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 68 टक्क्यांवर गेले आहे. पहिला डोस 21 लाख 27 हजार 906 जणांनी, तर दुसरा डोस 15 लाख 60 हजार 566 जणांनी घेतला आहे.
सोलापूर शहरात सहा लसीकरण केंद्रे
सोलापूर जिह्यात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी या दोन्ही लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. सोलापूर शहरात सहा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
सकाळी रेल्वे हॉस्पिटलमध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधीक्षक आनंद कांबळे व पालिका आणि रेल्वे हॉस्पिटल अधिकारी उपस्थित होते. शहरात 15 ते 18 वयोगटाचे 50 हजार तर 1 ते 14 वयोगटाचे पावणेदोन लाख मुले अपेक्षित धरून नियोजन करण्यात आले आहे.






























































