
>> स्पायडरमॅन
‘मोबाईल’ हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग बनला आहे, असे म्हटले तरी हरकत नाही. प्राणापलीकडे लोक या आपल्या मोबाईलला जपत असतात, पण बरेचदा कितीही काळजी घेतली तरी या मोबाईलसोबत काही ना काही दुर्घटना ही घडतेच. एकदा का अशी दुर्घटना; जसे की मोबाईल हातातून पडणे, मोबाईलवरती एखादी जड वस्तू पडणे घडले की, मोबाईलची ‘स्क्रीन’ हमखास ‘हे राम’ म्हणतो आणि तडकते. ही तडकलेली ‘स्क्रीन’ काळजाला आणि खिशाला चांगलीच भारी पडते हे नक्की, पण समजा, एखाद्या दुर्घटनेत तुमच्या मोबाईलची ‘स्क्रीन’ तडकली आणि त्याने स्वतःच स्वतःला दुरुस्त करून पूर्ववत केले तर? नाही, ही काही अद्भुत कल्पना किंवा एखाद्या सायन-फिक्शन चित्रपटातील सीन नाही. ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरत आहे. आयआयएसईआर कोलकाता आणि आयआयटी खरगपूर येथील संशोधकांच्या टीमने एकमेकांच्या सहकार्याने एक अनोखा पदार्थ ‘पायझोइलेक्ट्रिक मॉलिक्यूलर क्रिस्टल (Piezoelectric Molecular Crystals)’ विकसित करण्यात यश मिळवले आहे. हा पदार्थ एखाद्या अपघातानंतर स्वतःमधील ‘इलेक्ट्रिक चार्ज’ अर्थात ‘आंतरिक विद्युत प्रभारां’च्या मदतीने स्वतःची दुरुस्ती स्वतः करू शकणार आहे. या पदार्थापासून निर्माण करण्यात येणारे अनेक इलेक्ट्रिक पार्ट अशा प्रकारे स्वतःची दुरुस्ती स्वतः करण्यात वाकबगार असतील आणि म्हणूनच या पदार्थाला ‘सेल्फ हीलिंग क्रिस्टलाईन’ असेदेखील नाव देण्यात आले आहे. आपण मोबाईलच्या ‘स्क्रीन’चे उदाहरण पाहिले, मात्र हे उदाहरण खूपच किरकोळ आहे. अंतराळात जेव्हा एखाद्या अंतराळयानाचे अथवा अंतराळ प्रयोगशाळेतील एखाद्या महत्त्वाच्या इलेक्ट्रिक पार्टचे काही कारणाने नुकसान झाले आणि जिथे तत्काळ मानवी हस्तक्षेप शक्य नाही अशा ठिकाणी या पदार्थापासून बनवलेले भाग स्वतःच आपली दुरुस्ती करून घेतील आणि येणाऱया अडचणींपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतील. हा पदार्थ भविष्यात अंतराळ क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय शाखा अशा अनेक क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणार आहे.




























































