ठसा – डॉ. वैभव घोबाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रचना लचके-बागवे

वैभव बालाजी घोबाळे यांनी संभाजीनगर विद्यापीठातून आपली बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली आहे. वैभव यांनी लातूरमध्ये एका खासगी कंपनीमध्ये काही महिने काम केले. काम करत असताना उद्योजक शिबिराची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी मुंबई गाठली. मुंबईतील टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट, शहाड येथे त्यांनी अठरा दिवसीय निवासी उद्योजकता शिबिराचा लाभ घेतला. हे शिबीर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. आज महाराष्ट्रभर वैभव घोबाळे यांच्या व्ही. जी. एंटरप्राइजेस या कंपनीची वेगळी ओळख आहे. यासोबतच महिला बचत गट, पुरुष बचत गट, आर्थिक विकास महामंडळ यांसारखे सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले. तसेच लातूर जिल्हा उद्योग केंद्रात लातूर जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले. उद्योजक बनू इच्छिणाऱया नवउद्योजकांना मार्गदर्शन करीत त्यांच्या उद्योग उभारणीकरिता विशेष प्रयत्न केले आणि त्या नवउद्योजकांना उद्योगाकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग सुलभ केला आणि यासाठीच KCED अर्थात ‘क्रांती उद्योजकता विकास केंद्राची स्थापना केली. अगदी कमी कालावधीमध्ये KCED च्या उत्तम कामगिरीबद्दल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव 2021’ या पुरस्काराने वैभव घोबाळे यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या उद्योग जगतात भरीव कामगिरी केल्याबद्दल कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीतर्फे वैभवला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.