
>>जयेश राणे
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे जाणे दुःखद आहे. त्यांनी जीवनात जे मिळवले ते कोणत्याही श्रीमंत व्यक्तीलाही पैसे मोजून मिळवणे शक्य नाही. यास्तवच त्या अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून गेल्या आहेत. अशी थोर माणसे निःस्वार्थीपणे समाजसेवेसाठी स्वतःच्या शारीरिक व्याधींकडे न पाहता झटत आहेत म्हणूनच समाजसेवा जिवंत आहे. कुठे पैशांसाठी लाचार झालेले भ्रष्टाचारी आणि कुठे समाजसेवेचा ध्यास घेतलेले सच्चे समाजसेवक. एकाला पैशांचा हव्यास तर दुसऱ्याला समाजसेवेच्या कर्तव्याची जाणीव आणि त्याप्रमाणे कृती. मला समाजसेवा करायची आहे असे केवळ शाब्दिक बुडबुडे सोडणारे आणि प्रत्यक्षात गरजूंच्या तोंडचा घास हिरावून घेणारे समाजद्रोहीसुद्धा आहेत. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्यावर जी ऋण असतात पैकी दोन ऋण म्हणजे समाजऋण आणि पितृऋण. अनाथांचे मायबाप होत मिळालेल्या मनुष्यजन्माचे सार्थक कसे करावे याचा पाठच त्या शिकवत राहिल्या, तसेच त्याचा ठसाही उमटवून गेल्या. त्यांच्या विचारांप्रमाणे समाजाकडून आचरण हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. मी, माझे घर, माझा मित्रपरिवार, नातेवाईक या चौकटीत अडकून न राहता यापलीकडे जात समाजालासुद्धा कुटुंब मानून त्याचा मनापासून स्वीकार केला, तर आपलाही मनुष्यजन्म सार्थकी लागेल. कितीही धनाढय़ व्यक्ती असली तरी इहलोकातून जाताना ती काहीच घेऊन जात नाही. आजीवन देश, समाजाला सहाय्य करून जे कमावले, त्याचे लोकांच्या हृदयात स्थान कायम राहणे हीच त्याची खरी पुंजी (ठेव) असते. ही सर्व सूत्रं लोकांना माहीत आहेत, पण तसे आचरण किती जणांचे आहे याचे उत्तर मिळणे कठीण नाही. आजूबाजूला डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःकडेच पाहिले तरी ते लक्षात येईल. घटनेने दिलेले कोणतेही पद नसताना केवळ आणि केवळ तीव्र समाज जाणिवेतून गरजूंसाठी सेवारत राहणे ही साधारण बाब नव्हे. म्हणजे तुमच्यात गरजूंविषयी तीव्र कळकळ असेल तर त्याचा डेरेदार वटवृक्ष कसा होऊ शकतो आणि त्याच्या छत्रछायेचा गरजूंना भक्कम आणि हक्काचा आधार कसा वाटू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे निःस्वार्थी समाजसेविका सिंधुताई होय.
आजकाल अनेकांना शनिवार – रविवार सुट्टी असते. त्यालाच जोडून जर आणखी एक सुट्टी आली तर बहुतांश जण पिकनिकला जातात. कारण काय तर कामाचा शीण दूर करण्यासाठी आणि विरंगुळा. या मंडळींनी त्यांचा दौरा समाजसेवा करणाऱ्या संस्थांकडे वळवून त्यांचे कार्य जवळून पाहत ते बारकाईने जाणून घेत स्वतःच्या वेळेप्रमाणे त्यांच्या कुटुंबात कृतीच्या माध्यमातून सहभाग घेतला तर ते नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी असेल. स्वतः आनंदी असावे असा संकुचित विचार करण्यापेक्षा सर्वांनी आनंदी असावे यासाठी मी काय योगदान देऊ शकतो हे महत्त्वाचे आहे.
सिंधुताईंच्या निधनाचे वृत्त आल्यावर लगेच सामाजिक प्रसारमाध्यमांवर त्याच्या पोस्ट प्रसारित झाल्या. यावरून लक्षात येते की, सध्याच्या आधुनिक पिढीलाही सिंधुताई परिचित आहेत. त्यांच्याकडून हा वारसा पुढच्या पिढय़ांकडेही जाईल अशी आशा करूया. यालाच जोडून सूत्र असे की, आधुनिकतेचा स्वीकार करणारी आजची पिढी पालकांचे ऐकत नाही आणि स्वतःचेच म्हणणे खरे करते. यामुळे प्रसंगी त्यांना ठेचही लागते. यातून अनुभव मिळतो असे असले तरी प्राथमिक स्तरावरच ऐकले गेले तर पुढे जाऊन धडपडण्याची वेळ येत नाही. कारण तसे झाल्यावर पुन्हा सावरण्यासाठी पालकांनाच झिजावे लागते आणि पाल्याला त्रास झाल्याचा त्यांना जो मानसिक त्रास होतो तो वेगळाच, जो ते कधीही दिसू देत नाहीत. मुलांनी पालकांतही सिंधुताईंना पाहावे. त्यामुळे आपसूकच वागण्या – बोलण्यात पालट होण्यास आरंभ होईल.





























































