मतदान करो ना! उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरातील निवडणुकांचा बिगुल वाजला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रोनचा वाढता संसर्ग सुरू असतानाच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात उत्तर प्रदेशात तब्बल सात टप्प्यांत मतदान होणार असून गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. पाचही राज्यांची मतमोजणी आणि निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत. दरम्यान, कोरोना नियमावलीच्या कडक अंमलबजावणीबरोबरच आयोगाने प्रचारावर निर्बंध जाहीर केले आहेत. प्रचार सभा, रोड शो, पदयात्रा, बाईक-सायकल रॅलींवर 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

कोविड नियमावली

जाहीर सभा, पदयात्रा, रोड शो, बाईक आणि सायकल रॅली, नुक्कड सभा यांस 15 जानेवारीपर्यंत बंदी.

घरोघरी जाऊन प्रचार करण्यास केवळ पाच जणांनाच परवानगी.

कोरोनामुळे पाच राज्यांत मतदानाची वेळ एक तासाने वाढवली.

सर्व निवडणूक कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक.

प्रचार सभेवेळी कोविड नियमांचे पालन आवश्यक. सभास्थळी मास्क, सॅनिटायझर राजकीय पक्षांनी उपलब्ध करून द्यावे.

राजकीय पक्षांनी व्हर्च्युअल प्रचारांवर भर द्यावा. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा.

प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर सुविधा.

निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती निवडणुकीस उभी राहिल्यास त्याने आणि त्याच्या पक्षाने क्राइम रेकॉर्ड जाहीर करावे.  सर्व गुह्यांची माहिती, प्रलंबित खटले तपशीलवार जोडावे. याशिवाय वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेलवर हे क्राइम रेकॉर्ड जाहीर करावे लागेल.

राज्य         मतदानाची तारीख   एकूण जागा बहुमत

उत्तर प्रदेश – फेब्रुवारी – 10, 14, 20, 23, 27, मार्च – 3, 7  403 202

पंजाब – 14 फेब्रुवारी  117 59

उत्तराखंड -14 फेब्रुवारी 70 36

गोवा – 14 फेब्रुवारी 40 21

मणिपूर – 27 फेब्रुवारी/ 3 मार्च 60 31

मतमोजणी – 10 मार्च 2022

10 फेब्रुवारी ते 7 मार्चदरम्यान निवडणुकीचे मतदान होईल.

पाच राज्यांतील 690 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया 24.90 लाख मतदार पहिल्यांदाच यंदा मतदान करणार आहेत. त्यात 11.40 लाख महिला मतदार आहेत. पाच राज्यांमध्ये 18.30 कोटी मतदार असून त्यात 8.50 कोटी महिला मतदार आहेत.