
मुंबईच्या विकासकामांसंबंधात अनेक प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत. पाणीपुरवठा, नदी शुद्धीकरण, पर्जन्य जलवाहिन्यांची कामे अशा विविध प्रकारच्या कामांचे तब्बल दोन हजार कोटींचे प्रस्ताव यामध्ये मांडले जाणार आहेत. यात शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता होणार आहे.
पालिकेच्या 2017च्या निवडणुकीच्या आधी शिवसेनेने मुंबईकरांनासाठी अनेक विकासकामांचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने गेल्या चार वर्षांत अनेक आश्वासनांची पूर्तताही झाली आहे. तर अनेक विकासकामांचे प्रस्ताव अजूनही येत आहेत. यात नदी शुद्धीकरण, पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर उपाय, चौक, वाहतूक बेटांच्या सुशोभीकरासह 500 चौरस फुटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मालमत्ता कर माफीच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले आहे. नव्या कामात पोयर नदीच्या शुद्धीकरणाचाही प्रस्ताव आहे. यावर महानगरपालिका 1 हजार 428 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. शिवाय कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खर्चाची तरतूद करण्यासाठी निधीचे स्थालांतर करण्यात येणार आहे. आगामी स्थायी समितीच्या बैठकीत 100हून अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत. यात या आठवडय़ाचे 56 प्रस्ताक तर मागील आठवडय़ाच्या तहकूब सभेच्या 50 प्रस्तावांचा समावेश आहे.
असे आहेत महत्त्वाचे प्रस्ताव
मुंबईच्या विविध भागातील पूरनियंत्रणासाठी पालिकेने तब्बल 100 कोटी रुपयांचे प्रस्ताव मांडले आहेत. यात शहर विभागातील पर्जन्य वाहिन्यांची क्षमता वाढविणे, नव्या पर्जन्य वाहिन्या टाकणे अशी कामे करण्यात येणार आहेत. हिंदमाता या ठिकाणच्या कामासाठी 27 कोटी 76 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हे तीन प्रस्ताव मिळून 99 कोटी रुपयांचा खर्च होईल.
पश्चिम उपनगरातील पाणी पुरवठय़ात सुधारणेसाठी जलवाहिन्या बदलणे, नव्या जलवाहिन्या टाकणे तसेच सिमेंटच्या रस्त्याखाली गेलेल्या वाहिन्यांचा मार्ग बदलण्यासाठी 79 कोटी 99 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबईतील भायखळा, मुंबादेवी, गिरगाव या भागातील पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी दुर्गादेशी मैदानात जलशय बांधण्यात आला आहे. या ठिकाणच्या पंपिंगची क्षमताही वाढकिण्यात येणार आहे. या चार प्रस्तावांसाठी 81 कोटीहून अधिकचा खर्च करण्यात येणार आहे. मुंबईतील उद्याने-मैदाने, वाहतूक बेटांच्या देखभालीसाठी 68 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.






























































