
गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. सोमवारी सकाळी भाजपचे कळंगूटमधील आमदार आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ मायेमचे आमदार प्रवीण झांटय़े यांनी राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोव्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याच्या गंभीर आरोपामुळे मागील महिन्यातच नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांना राजीनामा द्यावा लागला होता. निवडणूक जाहीर होताच गेल्या वर्षभरापासून सरकारवर नाराज असलेले ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी मंत्री पदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर काही तासांतच प्रवीण झांटय़े यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपला रामराम केला आहे.
लोबो कॉँग्रेस तर झांटय़े मगोपच्या वाटेवर
उत्तर गोव्यात मायकल लोबो यांचा मोठा दबदबा असून ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. लोबो यांच्यासोबत रेईस मागोस हेदेखील भाजपला रामराम करण्याची शक्यता असून त्यांना सलीगांव मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित आहे. आमदारकीचा राजीनामा देणारे प्रवीण झांटय़े हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात (मगोप) पिंवा तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
मायकल लोबो हे 2005 साली भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांनी 2012 साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. ते सगल दोन वेळा भाजपच्या तिकिटावर कळंगूट विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
प्रवीण झांटय़े हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत. त्यांचे वडील हे काँग्रेसचे उत्तर गोव्यातील खासदार होते. 2012मध्ये काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले. यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर ते मायेम मतदारसंघातून निवडून आले होते.
आतापर्यंत चौघांनी सोडली भाजपची साथ
गेल्याच महिन्यात कोर्टीलिम मतदारसंघाच्या भाजप आमदार अलिना सलडान्हा यांनी राजीनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे. वास्को द गामा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले भाजप आमदार कार्लोस अल्मेडा यांनी राजीनामा देत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर मंत्री मायकल लोबो, आमदार प्रवीण झांटय़े यांनीही आमदारकीचा राजीनामा दिल्याने भाजपची साथ सोडणाऱया आमदारांची संख्या चार झाली आहे.

































































