
रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफने) वर्षभरात ‘मिशन जीवन रक्षक’ मोहिमेंतर्गत मध्य रेल्वे मार्गावर मुंबई परिसरात 47 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. यामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याची गाडी पकडतानाच्या घटना असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. कल्याण स्थानकात सर्वाधिक 11 जणांचे प्राण वाचवले असून दादर स्थानकात दहा, ठाणे स्थानकात सहा, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार जणांना जीवदान दिले आहे. पनवेल येथे तीन, कुर्ला, वडाळा येथे प्रत्येकी दोघांचे प्राण वाचवले आहेत. तुर्भे, रोहा, टिटवाळा, कसारा, डोंबिवली, घाटकोपर, भायखळा, दिवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रत्येकी एकाचा प्राण वाचवण्यात आरपीएफला यश आले आहे. प्रवाशांना वाचवत असताना अनेकदा आरपीएफच्या जवानांना आपला जीव धोक्यात घालावा लागल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.



























































