
पालीजवळच्या साठरेबाबर गावामधील धनावडेवाडी येथे पहाटेच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता. ग्रामस्थांना वेळीच याची माहिती मिळाल्याने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
साठरेबाबर गावामधील धनावडेवाडी योगेश जयराम धनावडे यांच्या घराजवळच्या विहिरीमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला होता. विहिरीतून बिबट्याच्या आवाज आल्याने, त्यांनी पाहणी केली असता, विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांना आढळून आले. याची माहिती त्यांनी तात्काळ पाली परिमंडळ वन कार्यालयाचे वनपाल गौतम कांबळे यांना दिली. त्यांनी तत्काळ पाली येथील पिंजरा घेऊन, साठरेबाबर येथे धाव घेतली. बिबट्याच्या सुटकेसाठी पिंजरा विहिरीत सोडला. विहीर जवळपास 25 फूट खोल होती. तर त्यात 10 फुटापर्यंत पाणी होते. त्यावर बिबट्या तरंगत होता. तब्बल 3 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी वनविभाग पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी केली. नर जातीचा सहा वर्षांचा बिबट्या असून तो सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
बिबट्याची सुटका मोहीम विभागीय वन अधिकारी दीपक खाडे,सचिन नीलख, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ वन कार्यालय पालीचे वनपाल गौतम कांबळे, देवरूख वनपाल तौफिक मुल्ला, लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक नानु गावडे, विक्रम कुंभार, सागर पाताडे, राजेंद्र पाटील, मिताली कुबल यांनी स्थानिक ग्रामस्थ दिनेश चाळके, धनंजय चव्हाण, संतोष चव्हाण ,नयन साठले ,विजय बारगुडे , सचिन पेडणेकर, सरपंच वामन कांबळे यांच्या सहाय्याने पार पाडली. बिबट्याला पुन्हा सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.



























































