उडपी रेस्टॉरंटच्या आडून दारूची विक्री; पाचगणी बस स्थानकाजवळून अवैध दारूचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur

पाचगणी बस स्थानकाजवळील ‘तनिष्क उडपी रेस्टॉरंट’मधून पोलिसांनी दारूचा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. याप्रकरणी या रेस्टॉरंटचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिप्रसाद पुजारी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पाचगणी बस स्थानकाजवळ असणाऱया ‘एम. आर. थोरात’ बंगल्याच्या मालक माधुरी बडे यांनी आपले हॉटेल हरिप्रसाद पुजारी यांना चालविण्यास दिले होते. त्यांचा करार 2016 रोजी संपला होता. तसेच पुजारी यांनी 2016 पासून भाडे न देता त्या जागेवर कब्जा केला. बडे यांनी त्याला विरोध केला असता, पुजारी याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. बडे यांना न विचारता पुजारी याने रेस्टॉरंट दुसऱयाला चालवायला दिले. याशिवाय आतमध्ये बडे यांना न विचारता बेकायदेशीर बांधकाम सुरू केले.

रेस्टॉरंटच्या नावाखाली हरिप्रसाद पुजारी याने दारू विकणे, गुटखा विकणे असे उद्योग सुरू केल्याची माहिती मिळताच माधुरी बडे यांनी पाचगणी पोलीस ठाणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी ‘तनिष्क उडपी फॅमिली रेस्टॉरंट’मध्ये छापा टाकला. या छाप्यात रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीर देशी आणि विदेशी दारूचा साठा सापडला. रेस्टॉरंटच्या किचनची अवस्था अतिशय अव्यवस्थित होती.