
गडहिंग्लज तालुक्यातील हसुरचंपू येथील औद्योगिक वसाहतीमधील काजूच्या टरफलांपासून तेल काढण्याच्या रामकृष्ण ऍग्रो केमिकल्स या कारखान्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हसुरचंपू येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुशील गुप्ता यांचा रामकृष्ण ऍग्रो केमिकल्स हा कारखाना आहे. या कारखान्यात काजूच्या टरफलांपासून तेल काढण्यात येते. या कारखान्यात मोठय़ा प्रमाणात काजूची टरफले साठवून ठेवण्यात आली होती. आज पहाटे अचानक लागलेल्या आगीमध्ये कारखान्यातील कच्च्या मालासह अन्य साहित्य जळून खाक झाले. बाजूच्या दुसऱया शेडमध्ये कामगार झोपले होते. आगीमुळे कामगारांना जाग आल्यानंतर गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर पाच तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीमध्ये सुमारे दोनशे टन कच्च्या मालासह प्लॅनल बोर्ड, वीज पंप यांसह अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. काजू बियांच्या टरफलांचा साठा मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. जेसीबी चालक विवेक शिंदे व तौफिक नाईकवाडे यांनी धाडस करून जेसीबी शेडमध्ये नेऊन टरफलांचा ढीग उपसून टाकल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने आग तेल टाकीपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारखाना कार्यस्थळावर काजू टरफलांचा खच पडला होता. यावेळी संतोष तेली, उद्योजक संतोष शिंदे, उपसरपंच सचिन शेंडगे, महेश कोरी यांनी मदत केली.
































































