
अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) अभ्यासक्रम यंदापासून प्रादेशिक भाषांमधूनही शिकवला जाणार आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी हिंदीनंतर मराठी भाषा निवडली आहे. पहिल्याच वर्षी 1230 जागांपैकी 255 जागा भरल्या. त्यात 116 जणांनी हिंदीचा तर 60 जणांनी मराठीचा पर्याय निवडला आहे. मातृभाषेचा नेहमी उदो उदो करणाऱया कर्नाटकातील एकही विद्यार्थी आपल्या कन्नड भाषेतून इंजिनीयर होण्यास इच्छुक नाही अशी आकडेवारी सांगते.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये प्रादेशिक भाषांमधून जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. त्यानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे (एआयसीटीई)ने यंदापासून इंजिनीयरिंग अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमधूनही सुरू करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी एआयसीटीईने एक सर्वेक्षण करून इंजिनीयरिंगला शिकणाऱया विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. सुमारे 44 टक्के विद्यार्थ्यांनी प्रादेशिक भाषेमध्येही इंजिनीयरिंगचे शिक्षण मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले होते.
एआयसीटीईने यंदापासून प्रादेशिक भाषांमधूनही इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम सुरू केले. त्यासाठी देशातील 19 इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये 1230 जागांना मान्यता देण्यात आली. त्यातील फक्त 21 टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी, तमीळ, तेलुगू आणि बंगाली या भाषांचा पर्याय निवडला आहे. तमीळ भाषेतून 50, बंगाली 16 तर तेलुगू भाषेतून 13 विद्यार्थी इंजिनीयर होण्यास इच्छुक आहेत. एकाही विद्यार्थ्याने कन्नड भाषेची निवड केलेली नाही.
कन्नड ही कर्नाटकची मातृभाषा आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य होते. मात्र तेथील एकाही विद्यार्थ्याने कन्नड भाषेचा पर्याय इंजिनीयरिंग प्रवेशासाठी निवडला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
























































