शिक्षिकेचा बेली डान्स व्हायरल! नोकरी गेली आणि नवऱ्यानेही घेतला घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका शिक्षिकेने केलेल्या बेली डान्समुळे तिच्यावर नामुष्की ओढवली आहे. तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असून तिच्या नवऱ्यानेही तिच्यासोबत घटस्फोट घेतला आहे.

ही घटना इजिप्तच्या एका महिलेसोबत घडली आहे. या महिलेचं नाव आया युसुफ असं आहे. ती इजिप्तमध्ये शिक्षिकेचं काम करते. काही दिवसांपूर्वी नाईल नदीकिनारी झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात आयाने बेली डान्स हा नृत्यप्रकार करून दाखवला होता. त्या नृत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच गहजब झाला.

वास्तविक या व्हिडीओमध्ये आया युसुफ यांनी कोणताही अश्लील प्रकार केला नव्हता किंवा त्यांचा पेहराव देखील अश्लील नव्हता. मात्र, एका शिक्षिकेने अशा प्रकारे सार्वजनिकरित्या नृत्य करावं हे इजिप्तच्या सनातनी विचारसरणीच्या नागरिकांना आवडलं नाही. त्यांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली.

दुसरीकडे इजिप्तच्या महिला अधिकार कार्यकर्त्यांनी मात्र आया यांचं समर्थन केलं आहे. व्हिडीओत आक्षेपार्ह असं काहीही नसताना आया यांच्यावर जाणूनबुजून टीका केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओमुळे आया यांना वैयक्तिक आयुष्यातही नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असून त्यांच्या पतीनेही त्यांना घटस्फोट दिला आहे.

या प्रकारामुळे ही शिक्षिका व्यथित झाली असून व्हिडीओ चित्रीत करणाऱ्याविषयी तिने संताप व्यक्त केला आहे. त्याच्या व्हिडीओमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं तिचं म्हणणं आहे. सुदैवाने तिला दुसऱ्या एका शाळेत नोकरी मिळाली असून सध्या जीवन पुन्हा मार्गाला लागल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.