टीम इंडियाने गमावली इतिहास रचण्याची संधी, तिसऱ्या कसोटीसह दक्षिण आफ्रिकेने मालिका 2–1 अशी जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी नव्हे तो दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत पराभूत करण्याची संधी अखेर टीम इंडियाने गमावली आहे. आज केपटाऊनवर तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानला 7 विकेटने पराभूत करीत पुन्हा टीम इंडियाकडून लगान वसूल केले.

दक्षिण आफ्रिकन खेळपट्टय़ांवर कागदावर सुपरस्टार वाटणारे हिंदुस्थानचे फलंदाज केपटाऊनवरही सुपरफ्लॉप ठरले. अपवाद ठरला तो केवळ झुंझार नाबाद शतक करणारा यष्टिरक्षक रिषभ पंत. तिसरा आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेने 7 विकेट राखून जिंकला. हिंदुस्थानी संघाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे  आव्हान ठेवले होते. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 3 विकेट गमावून सहज पार केले. या विजयासह यजमान दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2-1ने जिंकली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने कसोटी मालिकेतील जोहान्सबर्गचा पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखालील संघाचे  दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले  आहे. पहिल्या डावात हिंदुस्थानने सर्व विकेट गमावून 223 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्व बाद 210 धावा केल्या. पहिल्या डावात हिंदुस्थानला 13 धावांची आघाडी मिळाली होती. हिंदुस्थानने दुसऱ्या डावात 198 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे  आव्हान ठेवले होते.

जेव्हा तुम्ही परदेशात खेळत असतात तेव्हा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. कारण पुन्हा एकदा तशी संधी तुमच्याकडे येईल की नाही, हे सांगता  येत नाही. पुनःपुन्हा चांगल्या संधी मिळत नाहीत. या कसोटीत आमच्याकडेही चांगल्या संधी आल्या होत्या, पण त्या वेळी लक्ष एकाग्र करून आम्ही खेळू शकलो नाही आणि हेच आमच्या पराभवाचे कारण आहे.’’

– विराट कोहली, हिंदुस्थानी कर्णधार

हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज पुन्हा अपयशी

यंदाच्या या दक्षिण आफ्रिकन दौऱ्यात टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, उमेश यादव असा बलवान वेगवान गोलंदाजांचा ताफा होता. पण हे गोलंदाज दक्षिण आफ्रिकन खेळपट्टय़ांवर विशेष प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. त्यातच हिंदुस्थानी फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याने गोलंदाजांचे विजयासाठीचे  प्रयत्नच तोकडे पडले.

पिटरसन पुन्हा ठरला यजमानांचा तारणहार

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सलामीवीर एडन मार्करम 22 चेंडूंत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर डीन एल्गर आणि किगन पिटरसनने डावाची धुरा सांभाळली. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर डीन 30 धावा करून तंबूत परतला. किगन आणि दुस्सेनने  तिसऱ्या विकेटसाठी  मोठी भागीदारी केली. चेंडूला असमान उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर किगन पिटरसनने 113 चेंडूंत 82 धावांची संयमी खेळी करीत संघासाठी विजयाचा पाया रचला. मात्र तो 82 धावांवर असताना शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पिटरसनच्या या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. पहिल्या डावातही पिटरसनने 166 चेंडूंत 66 धावांची खेळी करीत संघाचा डाव सावरला होता. पिटरसन बॅड झाल्यावर रस्सी वॅन दर दुस्सेन आमि टेम्बा बवुमा या जोडीने यजमानांना  विजय मिळवून दिला. रस्सी वॅन दर दुस्सेन याने नाबाद 41 आणि टेम्बा बवुमाने नाबाद 32 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

हिंदुस्थान – पहिला डाव, सर्व बाद 223, दुसरा डाव, सर्व बाद 198

दक्षिण आफ्रिका – पहिला डाव सर्व बाद 210, दुसरा डाव – 63.3 षटकांत 3 बाद 212 (डीन एल्गर 30, किगन मार्करम 82, रस्सी वॅन दर दुस्सेन नाबाद 41, टेम्बा बवुमा नाबाद 32; जसप्रीत बुमराह 54 धावांत 1, मोहम्मद शमी 41 धावांत 1 आणि शार्दूल ठाकूर 22 धावांत 1 विकेट)