नगरमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्केटयार्ड येथील एका दुकानातील लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळल्यामुळे एकजण जागीच ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.15) दुपारच्या सुमारास घडली.

शिवम भाऊसाहेब झेंडे (वय 19, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) असे मयत युवकाचे नाव आहे. ओंकार अरूण निमसे (वय 19), प्रिया सचिन पवार (वय 40), शितल शेषेराव चिमखडे (वय 24) अशी जखमींची नावे आहेत.

स्टेशन रस्त्यावरील मार्केटयार्ड परिसरात अभय मशिनरी नावाचे तीन ते चार मजली दुकान आहे. या दुकानात लिफ्टही बसविण्यात आलेली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. यात एकजण जागीच ठार झाला, तर तीनजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.

दरम्यान, मार्केटयार्डमधील बहुतांश बांधकामे अनधिकृत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या इमारतीला बांधकाम परवानगी होती का? लिफ्ट बसविणाऱया कंपनीने परवानग्या तपासल्या होत्या का? ही घटना कशी घडली? असे सवाल उपस्थित झाले आहेत.