उत्तराखंडमध्ये भाजपात कलह, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केली कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असतानाच आता उत्तराखंडमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाटय़ावर आला आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री हरकसिंह रावत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांचे पक्षातूनही सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे. त्यामुळे रावत आता खुलेआम भाजप विरोधात बोलू लागले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केवळ समाजमाध्यमांमधील बातम्यांच्या आधारे माझी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. त्यांनी माझ्याशी कोणताही संवाद न साधता हा निर्णय घेतला आहे. ही विनाशकाले विपरित बुद्धी असल्याची टीका रावत यांनी केली आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. मी जर काँग्रेस सोडून भाजपात आलो नसतो तर चार वर्षांपूर्वीच भाजपला रामराम केला असता. मला मंत्रीपदाचा कोणताही शौक नाही, मी केवळ काम करू इच्छितो, असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबर पुढील वाटचालीबाबत मी काँग्रेससोबत बोलणी करणार आहे. उत्तराखंडमध्ये आता बहुमताने काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले.