पश्चिम महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीत दिग्गजांना धक्का; खानापुरात भगवा फडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे 23 वर्षीय चिरंजीव रोहित पाटील यांनी प्रस्थापितांना धक्का देत एकहाती सत्ता घेतली. कडेगाव नगरपंचायतीत विद्यमान कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना पराभवाचा धक्का बसला, तर खानापूर नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिल्ह्यातील या तीन नगरपंचायत निवडणुकींच्या निमित्ताने काही ठिकाणी नवी राजकीय समीकरणे उदयास आली, तर अनेक प्रस्थापितांना झटका बसला आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, खानापूर आणि कडेगाव नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तिन्ही ठिकाणी प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक झाली. 17 पैकी 10 जागा रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने जिंकून एकहाती सत्ता मिळवली. रोहित पाटील यांच्याविरोधात भाजपचे खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडीने चुरस निर्माण केली होती. मात्र, दिग्गजांच्या या आघाडीला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले. एक जागा अपक्षाला मिळाली. निवडणुकीत भाजपने स्वतंत्र पॅनल उभे केले होते. मात्र, भाजपला खातेही उघडता आले नाही. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांची राजकीय मैदानात जोरदार एण्ट्री झाली आहे. खासदार पाटील गटाला 4, अजितराव घोरपडे यांच्या गटाला 2, तर अनिता सगरे गटाला एक जागा मिळाली.

कडेगाव नगरपंचायतीत राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना धक्का
कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी मोठा धक्का दिला. भाजपने 10 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला फक्त 6 जागा मिळाल्या. कडेगाव नगरपंचायतीत यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती. डॉ. विश्वजित कदम यांनी सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणून अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, तरीही मतदारांनी त्यांना डावलून भाजपला साथ दिली. भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी मोठय़ा ताकदीने ही निवडणूक लढविली. 17 जागांपैकी 10 जागा संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनेलने मिळवल्या, 6 जागा काँग्रेसला, तर एक जागा अपक्षाला मिळाली.

खानापुरात शिवसेनेला सर्वाधिक जागा
खानापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत जनता विकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत तीन पॅनलमध्ये जोरदार लढत झाली होती. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील जनता विकास आघाडीला 9 जागा मिळाल्या. त्यात शिवसेनेला सर्वाधिक 5 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 4 जागा मिळाल्या. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही आटापिटा केला. परंतु, भाजपला एक जागाही मिळवता आली नाही. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनता आघाडीला 8 जागा मिळाल्या.

कोरेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांना धक्का
कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने 13 जागांवर विजय मिळवत परिवर्तन घडवले आहे. राष्ट्रवादीला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा बँकेपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेचे विजयी उमेदवार (कंसात प्रभाग क्रमांक): स्नेहल अर्जुन आवटे (1), साईप्रसाद सुरेश बर्गे (2), वनमाला प्रदीप बर्गे (3), दीपाली महेश बर्गे (4), सागर दत्ताजीराव बर्गे (5), सागर नारायण वीरकर (6), राहुल रघुनाथ बर्गे (7), अर्चना किरण बर्गे (8), राजेंद्र कोंडिबा वैराट (12), संगीता नितीन ओसवाल (13), परशुराम चंद्रकांत बर्गे (14), शीतल संतोष बर्गे (15) व सुनील बाळासाहेब बर्गे (16).

राष्ट्रवादीः संजीवनी सचिन बर्गे (9), हेमंत आनंद बर्गे (10), प्रभावती आनंदराव बर्गे (11), मोनिका गणेश धनवडे (17).कोरेगाव नगरपंचायतीत परिवर्तन घडवल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी विजयी उमेदवारांसह शहरातून रॅली काढली

कर्जत नगरपंचायतीत भाजपचा खुर्दा; रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली 12 जागा मिळवीत राष्ट्रवादीचा विजय
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला पुन्हा धक्का दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने एकहाती सत्ता मिळविली आहे. 17पैकी 15 जागा या दोन पक्षांनी जिंकल्या असून, भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत.

कर्जत नगरपंचायतीत 17 जागांसाठी निवडणूक झाली. यांतील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध मिळविली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे चार जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. सुरुवातीला 12 जागांसाठी मतदान झाले, तर काल चार जागांसाठी मतदान झाले. आज सर्व 16 जागांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीत सत्तांतर घडविले.

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार (कंसात प्रभाग क्रमांक): ज्योती लालासाहेब शेळके (1), लंकाबाई देवीदास खरात (2), संतोष सोपान मेहेत्रे (3), सतीश उद्धवराव पाटील (7), अमृत श्रीधर काळदाते (9), उषा अक्षय राऊत (10), नामदेव चंद्रकांत राऊत (12), सुवर्णा रवींद्र सुपेकर (13), ताराबाई सुरेश कुलथे (14), भास्कर बाबासाहेब भैलुमे (15), प्रतिभा नंदकिशोर भैलुमे (16), छाया सुनील शेलार (17). काँग्रेसःरोहिणी सचिन घुले (5), मोनाली ओंकार तोटे (6), भाऊसाहेब सुधाकर तोरडमल (8). भाजपः अश्विनी गजानन दळवी (4), मोहिनी दत्तात्रय पिसाळ (11).

सासरे आणि सूनबाई पुन्हा विजयी
कर्जत नगरपंचायतीत विद्यमान नगराध्यक्ष असलेले नामदेव राऊत व त्यांच्या सूनबाई उषा अक्षय राऊत हे दोघेही पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीतही हे दोघे विजयी झाले होते. विजयाची परंपरा सासरे आणि सूनबाई यांनी या निवडणुकीतदेखील कायम राखली. या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा नऊजण सभागृहामध्ये आले आहेत, तर आठजण प्रथमच निवडून आले आहेत. दोन विद्यमान नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व
सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचा गजर झाला आहे. पाटण, खंडाळा, लोणंद तसेच दहिवडी नगरपंचायतीत राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले आहे.

पाटण नगरपंचायतीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीप्रणीत पॅनेलने 17 पैकी 15 जागा जिंकत आपला गड अजिंक्य ठेवला. येथे शिवसेनेला दोन जागा मिळाल्या. खंडाळय़ात राष्ट्रवादीप्रणीत पॅनेलने 10 जागा मिळवत नगरपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. या ठिकाणी अन्य 7 जागा भाजपच्या पॅनेलला मिळाल्या. लोणंद नगरपंचायतीतही राष्ट्रवादीप्रणीत पॅनेलने 10 जागा जिंकून सत्ता कायम राखली. या ठिकाणी काँग्रेसला 3, भाजपला 3 तसेच अपक्षाला 1 जागा मिळाली. खंडाळा व लोणंद नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवत आमदार मकरंद पाटील यांनी मतदारसंघावरील मजबूत पकड दाखवून दिली. दहिवडीत आमदार जयकुमार गोरे यांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सर्वाधिक 8 जागा जिंकल्या. यानिमित्ताने माणच्या मुख्यालयात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा करिश्मा चालल्याने माणदेशाच्या भुवया उंचावल्या.

वडूज नगरपंचायतीचा कौल मात्र त्रिशंकू लागला. या ठिकाणी भाजपला 6, राष्ट्रवादीला 5, काँग्रेसला 1, वंचित आघाडीला 1 तर अपक्षांनी 4 जागी यश मिळाले. येथे नगरपंचायतीच्या चाव्या कुणाच्या हाती द्यायच्या हे अपक्षांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याने अपक्षांचे महत्त्व वाढले आहे.

पारनेर नगरपंचायतीत त्रिशंकू अवस्था
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने पारनेर नगरपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीला सात, शिवसेनेला सहा, शहर विकास आघाडीला दोन, तर भाजपला एक जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला शहर विकास आघाडी व अपक्ष उमेदवारांवर विसंबून राहावे लागणार आहे.

पारनेर नगरपंचायतीमधील विद्यमान 17 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवकांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा नशीब आजमावले होते. मात्र, या नगरसेवकांपैकी नगर पंचायतीच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सुरेखा भालेकर यांनाच केवळ मतदारांनी स्वीकारले. प्रभाग क्रमांक दहामधून त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 90 मतांनी पराभव करून विजयी झाल्या.

प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेचे उमेदवार युवराज पठारे हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार औटी यांचा तब्बल 386 मतांनी पराभव केला. या प्रभागात झालेल्या 655 मतदानापैकी निम्म्यापेक्षा जास्त 496 मते मिळवून पठारे विजयी झाले.

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात प्रभाग): सुप्रिया शिंदे (प्रभाग क्रमांक 2), नितीन अडसूळ (प्रभाग क्रमांक 5, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष), नीता औटी (प्रभाग क्रमांक 6), हिमानी नगरे (प्रभाग क्रमांक 9), डॉ. विद्या कावरे (प्रभाग क्रमांक 12), विजय सदाशिव औटी (प्रभाग क्रमांक 13), प्रियांका औटी (प्रभाग क्रमांक 17).

शिवसेनाः शालूबाई ठाणगे (प्रभाग क्रमांक 1), नवनाथ सोबले (प्रभाग क्रमांक 4), विजया गंधाडे (प्रभाग क्रमांक 7), नीता ठुबे (प्रभाग क्रमांक 14), झायदा शेख (प्रभाग क्रमांक 15), युवराज पठारे (प्रभाग क्रमांक 16). भाजपः अशोक चेडे (प्रभाग क्रमांक 11), शहर विकास आघाडीः भूषण शेलार (प्रभाग क्रमांक 8), सुरेखा अर्जुन भालेकर (प्रभाग क्रमांक 10), अपक्षः योगेश मते (प्रभाग क्रमांक 3).

दिग्गजांना पराभवाचा धक्का
पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री विजय औटी यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश खोडदे यांच्या पत्नी स्वाती खोडदे, माजी उपनगराध्यक्ष व शहर विकास आघाडीचे नेते चंद्रकांत चेडे, त्यांच्या पत्नी आशा चेडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका विजेता सोबले, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मालन शिंदे, नगरसेवक विशाल शिंदे, नगरसेवक नंदकुमार औटी यांच्या पत्नी मयूरी औटी, नगरसेविका शशिकला शेरकर यांच्या स्नुषा सुनंदा शेरकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

अकोल्यात पिचडांच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत
अकोले नगरपंचायत निवडणुकीत 17 जागांपैकी 12 जागा जिंकत माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपने बहुमत मिळवले. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 2 तर शिवसेनेला 2 जागा, तर मधुकरराव नवले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून अटीतटीच्या लढतीत 3 मतांनी भाजपाचे सागर निवृत्ती चौधरी, प्रभाग 11तून वैष्णवी धुमाळ 7 मतांनी, प्रभाग क्रमांक 16 मधून माधुरी शेणकर 5 मतांनी विजयी झाल्या. तर, सर्वाधिक 269 मताधिक्क्याने भाजपाचे प्रभाग 8चे बाळासाहेब वडजे हे विजयी झाले.

भाजपचे विजयी उमेदवारः सागर निवृत्ती चौधरी, प्रतिभा वसंत मनकर, हितेष रामकृष्ण कुंभार, सोनाली लक्ष्मीकांत नाईकवाडी, बाळासाहेब काशिनाथ वडजे, शीतल अमोल वैद्य, वैष्णवी सोमेश्वर धुमाळ, तमन्ना मोहसिन शेख, शरद एकनाथ नवले, माधुरी रवींद्र शेणकर, कविता परशुराम शेळके. शिवसेनाः विमल संतू मंडलिक, नवनाथ विठ्ठल शेटे राष्ट्रवादीः श्वेताली मिलिंद रुपवते, आरिफ शमसुद्दीन शेख. अपक्षः जनाबाई मोहिते, प्रदीपराज नाईकवाडी.

पक्षीय बलाबल
भाजप – 12
शिवसेना – 2
राष्ट्रवादी – 2
काँग्रेस – 1